Pune : सतरा वर्षांपासून करताहेत ते मून’लाइट’ मध्ये ‘हार्ड’वॉक

राजाराम पूल ते सिंहगड पायथा 18 किमी मूनलाईट वॉक

( विश्वास रिसबूड )

एमपीसी न्यूज- फिटनेस….. आरोग्यमंत्र…… हे आजच्या काळातील परवलीचे शब्द झाले आहेत. प्रत्येकजण स्वतःला आरोग्याच्या दृष्टीने फिट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने धडपडतोय. चालणे हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे असे डॉक्टर सांगतात. एक तर या प्रकारात फार कसरती कराव्या लागत नाहीत. आपण नेहमी चालत असतो. फक्त त्या चालण्याला एक नियमितपणा आणि थोडा वेगळेपणाचा ‘टच’ दिला तर ते चालणे अधिक आनंददायी आणि उत्साहाचे ठरते.

चांदण्यात फिरण्याची कल्पना हीच मुळात रोमँटिक आहे. अहो, या चांदण्याचे वर्णन करण्यासाठी कितीतरी कवी, कित्येक शायर मंडळींनी आपल्या लेखण्या घासल्या आहेत. मग असा रोमँटिक अनुभव घेता घेता थोडे फिटनेसकडे देखील लक्ष द्यायला काय हरकत आहे ? उगाचच रमतगमत, गप्पाटप्पा करत भटकण्यापेक्षा अंगातील घाम काढून झपाझप पावले टाकत चाललो तर चांदण्यात चालण्याचा आनंद तर मिळेलच शिवाय फिटनेस देखील उत्तम राहील. हे म्हणजे एकाच तिकिटात दोन शो

पुण्यात 2003 साली एका वेड्या माणसाने शंभर पौर्णिमेचा संकल्प करून मुनलाईट वॉक सुरु केला. या वेड्या माणसाचे नाव आहे. दत्तात्रय गोविंद मेहेंदळे. काय आहे हा त्यांचा मुनलाइट वॉक ? प्रत्येक वाहिन्यांच्या पौर्णिमेनंतर येणाऱ्या शनिवारच्या मध्यरात्री ठीक एक वाजता दत्तवाडी जवळील गणेश मळ्यापासून सिंहगड रस्त्याने पायी निघायचे व मजल दरमजल करीत पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान सिंहगड पायथा गाठायचा. त्यानंतर चहा घ्यायचा आणि गडाकडे येणाऱ्या सार्वजनिक वाहनाने परत आपापल्या घरी पोहोचायचे. अत्यंत साधा संकल्प वाटत असला तरी मध्यरात्री स्वतःच्या झोपेचे खोबरे करून चालायचे, शिवाय डोक्यात बसलेली भुताखेतांची भीती, चोरट्यांचे आणि रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचे भय या सगळ्या गोष्टींचा विचार करता कोण असल्या नसत्या फंदात पडणार ?

पण मेहेंदळे काकांची बातच न्यारी ! त्यांनी आपल्या परीने आपल्या सहकाऱ्यांच्या डोक्यात ही कल्पना भरवली. त्याला साथ देखील मिळाली. सुरुवातीला पाच- सहा लोक निघाले. पण नंतर या माळेमध्ये एक एक मणी गुंफला जाऊ लागला.

‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’

2012 मध्ये या मुनलाइट वॉकची सेंच्युरी झाली आता तब्बल 17 वर्ष झाली हा उपक्रम अविरतपणे, अखंडितपणे सुरु आहे. ज्यांनी पहिल्या चांदण्याचा अनुभव घेतला त्यांची गणना आता ज्येष्ठांमध्ये झाली आहे. या मुनलाइट वॉकचा आनंद घेऊन या ग्रुपची आणखी माहिती घ्यावी यांच्यामधील अनेक वेड्या लोकांना भेटावे, त्यांचे अनुभव ऐकावेत म्हणून शनिवारी मी देखील या मुनलाइट वॉकमध्ये सहभागी झालो. सध्या या ग्रुपचे नेतृत्व अनंत अगरखेडकर यांच्याकडे आहे. नियोजित वेळेप्रमाणे मी आणि माझी पत्नी सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ आलो तर या ठिकाणी अनेक भटके लोक जमा झाले होते. सात वर्षाच्या चिमुकलीपासून ते 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळ्या वयोगटातील स्त्री पुरुष या ठिकाणी जमले होते. सुमारे 60 जण या मुनलाइट वॉकमध्ये सहभागी झाले होते.

मुख्य म्हणजे या मुनलाइटचे प्रणेते मेहेंदळे आजोबा देखील आपल्या सायकलवरून या ठिकाणी आम्हाला निरोप द्यायला आले होते. पांढरी शुभ्र दाढी असलेले हे भारदस्त व्यक्तिमत्व वयाची 80 ओलांडली तरी ताठ मानेने उभे होते. त्यांनी या उपक्रमाचा इतिहास थोडक्यात सांगितला. नवीन सहभागी लोकांनी कशाप्रकारे काळजी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी आजपर्यंत 100वेळा ही पदयात्रा पूर्ण केलेली आहे. त्यांच्यासोबत वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेले जयंत केळकर त्यांनी हा मुनलाईट वॉक त्यांच्या बरोबरीने पूर्ण केला आहे तर महेश गाडगीळ यांनी 140 वेळा मुनलाईट वॉक पूर्ण केलेला आहे. असे रथी महारथी या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांच्या एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. नेहमीप्रमाणे उपस्थितांची हजेरी घेण्यात आली. एक फोटोसेशन झाले.

त्यानंतर जयंत इनामदार यांनी शंखनाद करून झाल्यावर पदयात्रेला सुरुवात झाली. प्रत्येकजण आपापल्या चालीने पुढे निघाला. सुरुवातीला एकत्र चालणे झाले पण ज्यांना या मुनलाइट वॉकचा अनुभव होता ते झपाझप पावले टाकत पुढे निघाले. काही पुढे काहीजण मागे असे सर्वजण निघालो. दोन वाजत आले तरी रस्त्यावर तुरळक रहदारी होती. रस्त्यावरच्या लाईटमुळे चांदणे असून देखील ते अनुभवता येत नव्हते. चालण्यामुळे अंगाला घाम आल्याबरोबर स्वेटर कानटोपी सॅकमध्ये गेली.

धायरी फाट्याजवळ आमच्यामध्ये आणखी काहीजण सहभागी झाले. पुन्हा एकदा ग्रुपफोटो, सेल्फी घेतल्यानंतर आमची पदयात्रा पुढे निघाली. नांदेड फाटा मागे पडला आणि रस्त्यावरच्या दिव्यांची संख्या कमी होत गेली. वाहनांची वर्दळ कमी झाली. खऱ्या अर्थाने चांदणे अनुभवायला सुरुवात झाली. रस्त्याच्या कॉंक्रीटिंगचे काम सुरु असल्यामुळे काही ठिकाणी चांगला रस्ता तर काही ठिकाणी खड्डे चुकवत पुढे निघालो. सोबत टॉर्च घेतला होता. अगरखेडकर स्वतः हेडलाईट लावून आमच्या बरोबरीने सायकलवरून निघाले होते. ग्रुपमधील काहीजण सर्वात शेवटी मागून चालत येत होते. जेणेकरून त्यांच्या मागे कुणीही असता कामा नये. कुणी चुकून मागे राहिला तर गडबड व्हायची. त्यात या पदयात्रेमध्ये महिला देखील असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते.

शहर मागे पडले तसा रस्त्यावर शुकशुकाट झाला. रस्त्यावरची भटकी कुत्री आमच्याकडे पाहून भुंकत होती. पण कुणी आमच्यामागे भुंकत आला नाही. इतकी वर्षे या रस्त्याने जात असल्यामुळे बहुतेक त्यांना देखील माहित असावे की ही मुनलाइट वॉकची मंडळी आहेत. टेन्शनच काय काम नाही!

बरोब्बर सव्वा तीन वाजता आम्ही खडकवासला धरणाची भिंत मागे टाकून आय ए टी च्या प्रवेशद्वाराजवळ आलो. तिथे पाच दहा मिनिटे विश्रांती घेऊन फोटो सेशन करून मार्गस्थ झालो. आता हवेमध्ये गारवा जाणवू लागला पण चालत असल्यामुळे उष्णता निर्माण होत असल्यामुळे थंडी जाणवत नव्हती. टिपूर चांदणे पसरल्यामुळे रस्ता स्पष्टपणे दिसत होता. चंद्र देखील आमच्या सोबतीने निघाला होता. चारच्या सुमारास डोणजे गावच्या चौकात पोहोचलो. मी आणि माझी पत्नी आम्हीच दोघे सर्वात मागे राहिलो होतो. आमच्या दोघांची कपॅसिटी संपली. सिहंगड पायथ्याकडे येणाऱ्या पहिल्या बसने अतकरवाडी म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी जायचे असा आम्ही विचार केला.

इतक्यात ह्याच ग्रुपची प्रीती म्हस्के नावाची एक उत्साही सायकलपटू पहाटे पुण्यातून स्कुटरवरून या ठिकाणी आली. तिच्या विनंतीवरून आम्ही तिची स्कूटर घेऊन अतकरवाडीला पोचलो. ठरल्याप्रमाणे हॉटेल गुरुदत्तमध्ये एकेक जण या ठिकाणी पोहोचू लागला. साधारणपणे पाच वाजता सर्व मंडळी आली. गरमागरम वाफाळलेला चहा घेतला. केक खाल्ला. समारोपाचा शंखनाद झाला. इतक्यात सकाळची पहिली बस आली. गर्दी होती. त्यामुळे पटकन आत शिरून जागा पकडली. डोळ्यावर झोप असल्यामुळे पेंगत-पेंगत राजारामपुलापर्यंतचा परतीचा प्रवास झाला.

मुनलाइट उपक्रमाबद्दल बोलताना अनंत अगरखेडकर म्हणाले, ” सुरुवातीला एकमेकांशी फोनवरून संपर्क साधून वॉकची वेळ ठरवली जात असे. पण आता प्रत्येकाकडे मोबाइल आला आहे. त्यामुळे ग्रुप तयार करून व्हाट्स अँप द्वारे मोहिमेची तारीख, वेळापत्रक पाठवले जाते. येणारी व्यक्ती आपल्या नावाची नोंदणी करतो. आज पावेतो ग्रुपचे 158 सदस्य झाले आहेत आणि दिवसागणिक वाढत आहेत. आजपर्यंत एकदाही या मुनलाइट वॉकच्या दरम्यान अनुचित घटना घडलेली नाही. अखंडितपणे हा उपक्रम सुरु आहे. शिवाय याला कोणतीही फी नाही, वर्गणी नाही.. चहा सुद्धा आपापल्या पैशानी प्यायचा. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही बंधन नाही. स्त्री, पुरुष, लहान मोठे कोणीही सहभागी होऊ शकतात फक्त चालण्याची कपॅसिटी असणारी व्यक्ती हवी इतकंच”

एकूणच हा कायमचा स्मरणात राहील असा आनंददायी अनुभव घेता आला. मी नेहमी म्हणतो. देवाने आपल्याला हे शरीर भाडेतत्वावर दिले आहे. देताना ते सुदृढ दिले आहे तर ते या जगातून जाताना सुद्धा त्याला सुदृढ अवस्थेमधील परत करणे आपले कर्तव्य नाही का ? मग थंडी, वारा, ऊन, पाऊस झेलत निसर्गामध्ये असलेल्या जीवनसत्वाचा आस्वाद घेत जगलात तर हे सहज शक्य आहे. तेंव्हा वेळ दवडू नका… चलते रहो !

(पुढील महिन्यातील मुनलाइट वॉक 8 तारखेच्या रात्री म्हणजे 9 तारखेच्या पहाटे 1 वाजता आहे अर्थात राजाराम पूल ते सिहगड पायथा. संपर्क – अनंत अगरखेडकर 8888887413)

(डावीकडून- अनंत अगरखेडकर, जयंत केळकर, मुनलाइट वॉकचे प्रणेते दत्तात्रय मेहेंदळे आणि महेश गाडगीळ)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.