Children’s Day Special : बालदिनाचे जनक – वि. मा. कुलकर्णी

एमपीसी न्यूज (मनस्विनी प्रभुणे-नायक) – पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून बालदिन साजरा होत असला तरी या बालदिनाचे खरे जनक वि. मा. कुलकर्णी हे होते. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधी महिला बाल कल्याण विभागाच्या मंत्री होत्या आणि वि.मा.कुलकर्णी हे त्यांचे सचिव होते. विमा शेवटची काही वर्षे चिंचवडमध्ये वास्तव्याला होते. या महान व्यक्तिमत्त्वाबरोबर काही काळ काम करण्याची संधी मिळालेल्या मुक्त पत्रकार मनस्विनी प्रभुणे-नायक यांनी बालदिनानिमित्त (Children’s Day Special ) विमांच्या आठवणींवर लिहिलेला विशेष लेख

बालदिनाचे जनक – ‘विमा’

काही माणसं आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि अचानक निघून जातात. यातली काही लक्षात राहतात तर काही विस्मृतीच्या गर्तेत हरवून जातात. लक्षात राहणाऱ्या, आठवणींमध्ये समावलेल्या व्यक्तींना कधीच विसरता येत नाही. ‘विमा’ हे त्यातलेच एक. ‘विमा’ हे माझे मित्र नव्हे तर माझ्या वडिलांचे म्हणजे गिरीश प्रभुणे यांचे मित्र होते. खरंतर विमा माझ्या आजोबांच्या वयाचे होते. त्यामुळे विमा आणि बाबांच्या मैत्रीबद्दलही मला आश्चर्य वाटायचं. पण त्यांच्या शेवटच्या काळात या आजोबांशी छान मैत्री झाली. वि. मा. कुलकर्णी असं त्यांचं नाव पण बाबा त्यांना ‘ विमा ‘म्हणायचे म्हणून माझ्याही तोंडी हेच नाव बसलं.

बालदिन जवळ येताच विमांची आठवण हमखास येते. कारण जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून बालदिन साजरा होत असला तरी या बालदिनाचे (Children’s Day Special ) खरे जनक वि. मा. कुलकर्णी हे होते. विमा हे साधंसुधं प्रस्थ नव्हतं. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना इंदिरा गांधी त्यांच्या मंत्रिमंडळात महिला बाल कल्याण विभागाच्या मंत्री होत्या आणि आपले वि. मा. कुलकर्णी हे त्यांचे सचिव होते. नुसतेच सचिव नव्हते तर गांधी घराण्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

नेहरूंच्या वाढदिवसा दिवशी इंदिरा गांधी यांना त्यांच्या विभागाकडून काही वेगळा कार्यक्रम आयोजित करायचा होता. त्यासंबंधी काही वेगळा कार्यक्रम सुचवावा म्हणून त्यांनी काही मान्यवरांची मिटिंग बोलावली होती. याच मिटिंगमध्ये वि. मा. कुलकर्णी यांनी 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करावा असं सुचवलं होतं. इंदिराजींना हि कल्पना आवडली आणि तेव्हा पासून 14 नोव्हेंबर हा बालदिन (Children’s Day Special ) म्हणून साजरा होऊ लागला.

1996 सालची गोष्ट आहे. पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना एकदा कॉलेजमधून घरी निघाले होते. पुणे मनपा बसस्टॉपवर अगदी मागच्या रांगेत उभे असलेले विमा मला दिसले. त्यांची माझी तशी ओळख नव्हती. ते बाबांचे मित्र म्हणून बाबांकडून खूपदा त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. त्यामुळे मी त्यांना मागच्या रांगेतून पहिल्या रांगेत जागा दिली. त्यामुळे बसमध्ये देखील त्यांना व्यवस्थित जागा मिळाली आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या.

जुन्या काळातील खलनायकाचं काम करणारा के.एन.सिंग नावाचा एक अभिनेता होता. या के. एन. सिंग सारखे ते दिसायचे. विशेषतः डोळे त्याच्यासारखे होते. त्यामुळेही ते अनेकांना ओळखीचे असल्यासारखे वाटायचे. मला भेटले तेव्हा त्यांनी सत्तरी ओलांडलेली, आवाजात किंचितसा कंप असलेले, थोडंसं कमी ऐकू येतं म्हणून कानाला यंत्र लावणारे असे होते.

हा त्यांचा निवृत्तीनंतरचा काळ असला तरी त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा होता. बायकोचं निधन झालं होतं. मूलबाळ नव्हतं. (Children’s Day Special) कष्टाने बांधलेलं घर नात्यातल्याच कोणीतरी यांच्या नकळतपणे बेकायदेशीररीत्या बाळकावलं. पण मेव्हण्याने म्हणजेच प्रसिद्ध गायक पंडित पद्माकर कुलकर्णी यांनी त्यांना चिंचवडला आणलं. आपल्या घराशेजारीच त्यांची स्वतंत्रपणे राहायची सोय केली आणि जगभर भ्रमंती केलेले विमा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात चिंचवडला स्थायिक झाले.

एका छोट्याशा स्वतंत्र खोलीत त्यांनी स्वतःचं जग तयार केलं होतं. भिंतीच्या एका बाजूला बेड, एक छोटासा टीपॉय, दोन खुर्च्या आणि पुस्तकांची शेल्फ अशा पद्धतीने ठेवली होती कि त्या छोट्याशा खोलीचे दोन भाग होत होते. नोकरीच्या निमित्ताने आणि निवृत्तीनंतरही वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करत असताना त्यांच्याकडून झालेला भाला मोठा पत्रव्यवहार, महत्वाची कागदपत्रे, अतिशय दुर्मिळ अशी छायाचित्रं, पुस्तकांची देखभाल, नव्याने करावा लागणारा पत्र व्यवहार या सगळ्यांसाठी त्यांना एका सहाय्य्यकाची आवश्यकता होती. तसं त्यांनी बाबांजवळ बोलून दाखवताच बाबांनी माझं नाव त्यांना सुचवलं.

विमांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट या पत्रकारितेचं शिक्षण देणाऱ्या संस्थेत ‘शोध पत्रकारिता’ हा विषय शिकवला होता. त्यामुळे सहाय्य्यक म्हणून मी त्यांना मदत करण्यापेक्षा मलाच त्यांच्याकडून पत्रकारितेतील अनेक गोष्टी शिकता येतील हा बाबांचा उद्देश होता. मी जरा नाराजीनेच हो म्हणाले. कारण त्यांचा तापट स्वभाव, अति काटेकोरपणा, निरग्रही पण थोडाश्या हट्टी स्वभावाबद्दल ऐकून होते. पण बाबांचं म्हणणं डावलता आलं नाही.

Vegetable prices : गवार, टोमॅटो, फ्लॅावर, मटारच्या भावात घट

 

संध्याकाळी रोज दोन तास मी त्यांच्याकडे जाऊ लागले. आधी सगळी पुस्तकं विषयावार लावून दिली. कितीतरी महत्वाचे संदर्भ ग्रंथ त्यांच्याकडे होते. त्यात पत्रकारितेशी संबंधित अनेक पुस्तकं होती. अधेमधे त्यातलं एखादं पुस्तक काढून ते वाचत बसायचे. वाचनासाठी त्यांच्याकडे एक मोठं भिंग होतं. त्या भिंगाच्या साहाय्याने वाचन करीत.कामाच्या निमित्ताने आमच्या रोज वेगवेगळ्या विषयावर गप्पा होऊ लागल्या यातच विमांचं गोव्याशी असलेलं वेगळं नातं मला समजलं.

निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात ते गोव्यात ‘प्रोव्हेदोरिया’ चे संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यावेळी प्रोव्हेदोरियाचं ऑफिस पणजीत होतं. विमांना मिरामारला राहण्यासाठी बंगला देण्यात आला होता. रोज ऑफिसला येण्याजाण्यासाठी कार आणि दिमतीला ड्रायव्हर देखील दिला होता.(Children’s Day Special) पण हे रोज मिरामारहून नदी किनाऱ्याच्या रस्त्याने चालत ऑफिसला यायचे. पहिल्याच दिवशी त्यांनी ड्रायव्हरला नको म्हणून सांगितलं आणि हे मिरामारच्या रस्त्याने चालू लागले.

विमा चालत चाललेत आणि ड्रायव्हर त्यांच्यामागे कार मधून येतोय असं ते दृश्य होतं. काही अंतरावर गेल्यानंतर विमांनी त्या ड्राव्हयरची वाईट शब्दात हजेरी घेतली. ते रोज चालतच ऑफिसला गेले. एवढा सुंदर रस्ता, सोबत करणारी मांडवी नदी असताना मी कार मधून कसा जाऊ शकलो असतो हे त्यांचं त्यावरच उत्तर होतं. आज माझं ऑफिस याच रस्त्यावर आहे. संध्याकाळी कधीतरी आम्ही मांडवी नदीच्या तीरावर चहाचे कप घेऊन जाऊन बसतो. याच रस्त्याने विमा चालत ऑफिसला गेले होते अनेकदा याची नकळतपणे आठवण होते.

एक दिवस त्यांनी बेडच्या खाली असलेल्या दोन – तीन पत्र्याच्या ट्रंक मला बाहेर काढायला लावल्या. यात त्यांचा पत्रव्यवहाराचा खजिना होता. मौल्यवान खजिन्यातून कधी हिरे -माणिक, सोनं -मोती हाताला लागावेत तसा या ट्रंकमध्ये हात घालताच कधी इंदिरा गांधी यांच्या हस्ताक्षरातलं पत्र हाती लागायचं तर कधी मेधा पाटकर यांनी आपल्या पात्रातून आपण स्वतः लिहिलेल्या कवितांनी भरलेलं पत्र हाती पडायचं.

प्रत्येक पत्र हातात पडताच माझा चेहरा आश्चर्याने भरून जायचा. त्यांना आलेली पत्र वाचायची तरी कशी? जरा संकोच वाटायचा. तारीखवार त्यांची विभागणी करून सगळ्या पात्रांची फाइल करायला सुरुवात केली होती. इंदिरा गांधींचं ठीक आहे पण मेधा पाटकर यांना का पत्र पाठवत होत्या? हा प्रश्न माझ्या डोक्यात राहिला. शेवटी न राहवून मी त्यांना मेधा पाटकर यांच्या पात्रांविषयी विचारलंच.

मनातलं कुतूहल बघून मला त्यांनी ती सारी पत्र वाचायला सांगितली. प्रत्येक पत्र वेगवेगळ्या गावातून आलेलं होतं.विमा आपल्या सनदी नोकरीतून निवृत्त झाले पण त्यांचा कामाचा दांडगा अनुभव पाहता अनेकांनी त्यांना परत नोकरीची ऑफर दिली. त्यात शरदचंद्र गोखले यांनी त्यांच्या ‘कास्प’ नावाच्या संस्थेत मोठ्या पदावर बोलावलं. विमा मुंबईमध्ये ‘कास्प’ला रुजू झाले.

तेव्हा मेधा पाटकर शिक्षण संपवून नुकत्याच कास्पला रुजू झाल्या होत्या. मेधा पाटकर यांच्यासारख्या कास्पमधील अनेक तरुण, उत्साही मुला-मुलींसाठी विमा मार्गदर्शक, प्रेरणास्थान बनले. कास्प सोडलं तरी त्यातील अनेकजण विमांशी जोडले गेले होते त्यातल्याच एक मेधा पाटकर होत्या. त्यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाचं काम जोरात सुरु होतं. पत्रात आंदोलनाचे वर्णन होतं तर कधी कविता लिहिलेल्या होत्या. मेधा पाटकर या संवेदनशील मनाच्या कवयित्री देखील आहेत हे मला ती पत्र वाचून कळलं.

सुंदर हस्ताक्षरातील त्यांची पत्रं एक वेगळाच ऐवज होता. ही पत्रं जपून ठेवून काय करायचं? ‘मी मेल्यावर हि पत्र बेवारस होणार’ असं विमांना वाटू लागलं आणि त्यांनी माझ्याकरवी ही सगळी पत्रं त्या-त्या व्यक्तीला परत पाठवून दिली.यातच त्यांच्या जवळ अनेक दुर्मिळ छायाचित्र होती.

फोटोग्राफीची आवड त्यांनी जपली. पत्रांच्या माध्यमातून एक वेगळं जग जसं समोर आलं तसं या दुर्मिळ छायाचित्रांमधून एक वेगळं जग, वेगळे ऋणानुबंध समजले. यात इंदिरा गांधी यांची असंख्य छायाचित्र होती. विशेषतः लहान राजीव आणि संजीव यांना खेळवत असतानाची. (Children’s Day Special) त्याप्रसंगी इंदिरा गांधी यांच्या चेहऱ्यावरील ममत्व बघण्यासारखे होते. यात इंदिरा गांधी यांचा नऊवारी साडीतला अतिशय सुंदर असा फोटो होता. विमांच्या बायकोने इंदिरा गांधींना नऊवारी साडी भेट दिली होती आणि त्यांनी मुद्दाम त्यांच्या बायकोकडून नेसून घेतली शिवाय विमांना फोटो देखील काढायला लावला होता.

इंदिरा गांधी यांचे कौटुंबिक व्यक्तिमत्व यानिमित्ताने उलगडलं जात होतं. इंदिरा गांधींचं लग्न ते राजीव गांधींचं लग्न असा एक मोठा कालखंड त्यांनी बघितला होता. खरंतर विमा इंदिरा गांधींवर एक चांगलं पुस्तक लिहू शकले असते. ‘माझं ते काम नव्हतं. मी ज्या कामासाठी तिथे होतो ते मी प्रामाणिकपणे केलं.’ असं त्यावर त्यांचं उत्तर असायचं. एकेदिवशी त्यांनी इंदिरा गांधी, संजय आणि राजीव गांधी यांचे सगळे फोटो एका पाकिटात घातले आणि मला पोस्टात घेऊन गेले. त्यांच्याकडे सोनिया गांधी यांचा पत्ता होता. त्या पत्त्यावर सगळे फोटो पाठवून दिले.

शेवटची ट्रंक उघडताच विमांच्या आयुष्यातलं एक वेगळं पर्व समोर आलं. पत्नीच्या निधनानंतर सांत्वनपर आलेली पत्र त्या ट्रंकमध्ये होती. सत्तर पंचाहत्तर लोकांनी पाठवलेल्या त्या पत्रात फक्त सांत्वन नव्हतं तर पत्नीशी संबंधित आठवणी होत्या. त्यांच्या नकळत पत्नीने अनेकांना मदत केली होती त्याचे उल्लेख होते जे वाचून विमांना आश्चर्य वाटलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती सगळी पत्र तारखेनुसार लावली आणि सगळी एकामागे एक वाचून काढली. ‘ काय करायचं या पत्रांचं?’ परत तोच प्रश्न.

विमांच्या पत्नीला जाऊन दहा वर्षे उलटून गेली होती. अजून किती काळ पत्र जपून ठेवायची असं त्यांना वाटत होतं. त्याचं एक चांगलं पुस्तक होऊ शकतं असं मला वाटलं आणि मी हे त्यांना सांगताच त्यांनी ती सगळी पत्र परत परत वाचून काढली. ‘ पुस्तकाची जबाबदारी तू घेणार असशील तरच हे पुस्तक करू या ‘ असं ताकीद दिल्यासारखं सांगून पुस्तकाच्या विचारात गुंतून गेले. आम्ही पत्रांची विभागणी सुरु केली. फक्त सांत्वन करणारी पत्र नको त्या पत्रात विमांच्या पत्नीचं वेगळेपण, एखादी आठवण, घटना असेल अशीच पत्र फक्त घेऊ या असं ठरवून कामाला लागलो.

मराठी वाड्मय जगतातील प्रसिद्ध समीक्षक व. दि. कुलकर्णी यांनी देखील आपल्या पत्नीच्या वियोगानंतर तिच्या आठवणींवर आधारित एक पुस्तक लिहिलं होतं. त्यांची या पुस्तकाला प्रस्तावना असावी असं मला वाटू लागलं. व.दि. कुलकर्णी तेव्हा पुण्यात राहत होते त्यामुळे त्यांच्याकडून लगेच प्रस्तावना मिळाली. (Children’s Day Special) इतके दिवस आपण का जगतोय? लवकर मरण यावं असं वाटणाऱ्या विमांच्या आयुष्यात या पुस्तकामुळे एक उत्साह आला. रोजचा दिवस पुस्तकाच्या चर्चेत, वेगवेगळ्या कामात जाऊ लागला. असे आनंदी, उत्साही विमा त्यापूर्वी बघितले नव्हते.

Blood donation : गुजर स्नेहवर्धिनी पुणे तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 80 बाटल्या रक्त संकलित

पुस्तक संपादनाचा माझा पहिलाच अनुभव होता. चित्रकार अनिल उपळेकर यांच्याकडून पुस्तकाचं सुंदर मुखपृष्ठ तयार होऊन आलं. ‘सांत्वनासाठी’ हे पुस्तकासाठी नाव त्यांनीच सुचवलं. पुस्तक प्रकाशनाचा सोहळा देखील उत्तमरीत्या पार पडला. प्रकाशनच्या वेळी देखील विमा त्यांच्या परखड शैलीत स्पष्टपणे बोलले. त्यांच्या बोलण्याला भावनिक किनार असली तरी त्यात कुठेही उदोउदो नव्हता.

सामान्यपणे एखादी व्यक्ती गेली की, तिच्याबद्दल चांगलंच बोलण्याचा आपल्याकडे प्रघात असतो. तिच्यात नसलेल्या गुण देखील मग तिला जोडले जातात. विमांनी बरोबर याच मुद्द्यावर बोट ठेवून ‘ माझी बायको कोणी देवी नव्हती. ती साधीसुधी होती. त्यामुळे ती इतरांपेक्षा कशी वेगळी होती हे सांगण्यात आणि तिच्या स्तुतीचे इमले बांधण्यात वेळ घालवणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या स्तुतीची सुमनं जशी उधळली जातात तसेच तिच्यातील दोषांवर देखील बोललं पाहिजे.’ असं ते त्यावेळी बोलले.

त्या प्रसंगी ते खूप वेगळे वाटले. आज आपलं कर्तव्य संपलं अशा रीतीने ते त्या दिवशी वावरत होते. पत्नीच्या निधनानंतर आलेल्या सांत्वनपर पत्रावर आधारित मराठीतील हे पाहिलंच पुस्तक होतं. या दरम्यान माझं पत्रकारितेचं शिक्षण संपून मला लोकसत्ता वृत्तपत्रात नोकरी मिळाली.(Children’s Day Special) दिवसेंदिवस त्यांच्याकडे जाणं अवघड होऊ लागलं आणि काही दिवसांनी मी ऑफिसमध्ये असताना विमा गेल्याचा फोन आला. जगण्याचं उद्दिष्ट संपल्यावर काय घडतं हे त्यांच्याकडे बघून उमगलं.

त्यांच्याकडून निघताना ते हातावर कायम खडीसाखर ठेवायचे. मीच नाही, जो कोणी त्यांच्याकडे यायचा, त्याला हा खाऊ मिळायचाच. आजही कोणी खडीसाखर दिली की, विमा आठवतात. बाजारातून एखादी गोष्ट कागदाच्या पुड्यात गुंडाळून आली आणि त्या पुड्याला घट्ट बांधलेला दोरा तोडण्यासाठी हातात कात्री घेतली कि विमा आठवतात. ‘जरा दोरीची गाठ सोडवायचा प्रयत्न तर करून बघ. कात्री घेऊन तो दोरा तोडून काढणं हा एक पर्याय आहे उपाय नाही.’ ते असं सांगायचे.

14 नोव्हेंबर (Children’s Day Special ) जवळ आला की, हे असंच होतं. विमा आणि त्यांच्या आठवणी दाटून येतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.