Diwali Special : आनंदाची अन जाणिवेची दिवाळी!

एमपीसी न्यूज (श्रीकांत चौगुले) – रोजच्या जगण्यातले साचलेपण आणि तोचतोचपणा दूर करून, आपल्या जीवनात नवचैतन्य (Diwali) निर्माण करण्याचे काम सण समारंभ करतात, म्हणूनच आपण प्रत्येक सण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. सणांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेले रीतीरिवाज पाळत असतानाच, काळानुसार झालेले बदलही आपण स्वीकारत असतो. अशा सणांपैकी दिवाळी सण मोठ्या आनंदाचा ठेवा ठरतो. संपूर्ण भारतभर दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीला दीपावली असेही म्हणतात. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिवाळी म्हणजे आनंदोत्सव. लहानथोर सर्वांना आनंद देणारा दिवाळी सण आहे.
दिवाळी सण साधारण पाच दिवसांचा असतो. त्याची सुरुवात अश्विन वद्य त्रयोदशीपासून (Diwali) होते. त्याला आपण धनत्रयोदशी म्हणतो. या दिवशी धनाची म्हणजेच कुबेराची पूजा करतात. त्यानंतरचा दिवस चतुर्दशीचा. या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करतात. अमावस्येला लक्ष्मीपूजन असते. त्यानंतरची तिथी प्रतिपदा. ती बलिप्रतिपदा असते तर पुढचा दिवस भाऊबिजेचा. अशाप्रकारे दिवाळीचे चार-पाच दिवस आनंदाचे मजेचे असतात. या दिवसांचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक पुराण कथा आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे दीपावली म्हणजे दीपोत्सव.. आनंदोत्सव.
दीपोत्सवाची परंपरा मात्र प्राचीन आहे, हे मात्र नक्कीच. भारतीय संस्कृतीत दीप हे मांगल्याचे प्रतीक आहे. दिव्यांमुळे अंधकाराचा नाश होतो. परिसर प्रकाशमान होतो. दिव्यांमुळे मनाची प्रसन्नता वाढते. उजेडाच्या सोबतीने मनातले नैराश्य दूर होते. मनातली भीती दूर होते. पूर्वीच्या काळी तेलवातीचे दिवे दारात, तुळशी वृंदावनात लावत. या दिव्यामुळे सात्विक प्रसन्नता मिळते. अलिकडे तेलाच्या दिव्यांबरोबर मेनाचे दिवे, विजेवरचे दिवे लावले जातात. घराघरावर रोषणाई केली जाते. रंगीबेरंगी दिव्यांमुळे मन आनंदित आणि प्रसन्न होते. काही ठिकाणी याचा अतिरेक केला जातो.
यासोबत दिवाळीत आनंदासाठी फटाके वाजवले जातात. फटाक्यांचे आकर्षण लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना असते. फटाके वाजवतानाही अतिआवाजाचे, कानठळ्या बसवणारे फटाके वाजवू नयेत. याचेही भान ठेवायला हवे. दिवाळीच्या दिवसात रस्त्यात पडणारा, फटाक्यांमुळे होणारा कचरा आणि ध्वनी प्रदूषण हानिकारक असते. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी, अधिक किमतीचे, अधिक मोठ्या आवाजाचे, भरपूर फटाके वाजवणे. योग्य नाही. दुसरे एक आपण ज्या श्रद्धा मानतो. त्या जपल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर आतमध्ये लक्ष्मीपूजन आणि बाहेर लक्ष्मी फटाक्यांच्या नावाखाली लक्ष्मीचे चित्र असणारे फटाके वाजवून, लक्ष्मीच्या चित्राची चिरफाड करायची. हे योग्य नाही.
दिवाळी सणात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. पूर्वी घरोघरी पदार्थ तयार केले जात. दिवाळी सणाच्या आधी चार-आठ दिवस सगळीकडे धामधूम असे. करंज्या तयार करणे, हा तर एक सामुदायिक निर्मितीचा प्रकार असे. आता त्यामध्ये बदल होतो आहे. शहरात तर चौकाचौकात मिठाईची दुकाने झाली आहेत. अगदी दररोज म्हटलं तरी मिठाई किंवा खाऊ घरी येऊ लागला आहे. पूर्वी अशा सुविधा नव्हत्या.आर्थिक स्थितीही नव्हती. त्यामुळे दिवाळीच्या दिवसातील फराळाचे फार मोठे अप्रूप असायचे. लाडू चकली म्हणजे आनंदाची पर्वणी असायची. घरातल्या स्त्रिया रात्र रात्र जागून स्वतः फराळ तयार करायच्या. त्यासाठी घरातल्या, शेजारच्या माणसांची मदत होत असे. आवडीने केलेले पदार्थ इतरांना शेजारी पाजारी दिले जात.