सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune : पुणे महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाला मिळाला सभागृह नेते पदाचा सन्मान !

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाला मंगळवारी सभागृह नेते पदाचा सन्मान मिळाला. धीरज घाटे हे आता नवीन सभागृह नेते असतील. त्यांचे वडील महापालिकेच्या जन्म – नोंदणी खात्यातून निवृत्त झाले. तर, आई महापालिकेच्या शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. घाटे हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी 4 वर्षे संघाचा प्रचारक म्हणून काम केले.

प्रारंभी परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि सेलू या दोन तालुक्यांत आणि नंतर बीड येथे जिल्हा प्रचारक म्हणून काम पाहिले. धीरज यांचा भाऊ धनंजय, बहीण धनश्री आणि आई – वडील पाचही वेगवेगळ्या संस्थांचे पूर्ण वेळ प्रचारक राहिले आहे. प्रचारक म्हणून थांबल्यानंतर घाटे यांनी भारतीय जनता पक्षात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात भारतीय जनता युवा मोर्चाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनतर ‘भाजयुमो’ च्या पुणे शहर सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

सध्या भाजपच्या प्रदेश चिटणीसपदी ते कार्यरत आहेत. भाजपच्या अनेक आंदोलनात ते आक्रमकपणे उतरतात. कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन करण्यावर त्यांचा भर असतो. घाटे यांनी 2017 ची पुणे महापालिका निवडणूक लढवून जिंकली. महापालिकेच्या सभागृहात त्यांनी पुणेकरांचे विविध प्रश्न पोटतिडकीने मांडले. त्याचीच दाखल घेऊन भाजपने आज घाटे यांची सभागृह नेता म्हणून निवड केली.

spot_img
Latest news
Related news