Chikhali: जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला तातडीने सुरुवात करा; पदाधिका-यांच्या अधिकारी, कंत्राटदाराला सूचना

चिखलीतील नियोजित जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेची पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिखली येथील गट नंबर 1654 या गायरान जागेवर जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाला तातडीने सुरुवात करावी. दीड वर्षाच्या आतमध्ये जलशुद्धीकरण केंद्राचे काम पुर्ण करण्यात यावे, अशा सूचना महापालिका पदाधिका-यांनी अधिकारी, कंत्राटदारांना दिल्या आहेत. काम सुरु करण्यासाठी येणा-या अडचणी, झाडांचे पुनर्रोपण याबाबतची माहिती घेतली.

चिखलीतील नियोजित जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेची महापौर उषा उर्फ माई ढोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी आज (मंगळवारी) पाहणी केली. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, उपअभियंता राजेंद्र मोराणकर, चंद्रकांत मुठाळ, ठेकेदार मे. रुद्राणी इन्फ्रास्ट्रकचरचे प्रतिनीधी व मे. गोंडवाणा इंजि. लि. चे प्रतिनिधी उपस्थित होते.

आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहाराला पाणी आणण्यात येणार आहे. त्याकरिता चिखली येथील गायरान जागेवर जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी व आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. पहिल्या टप्यात आंद्रा भामा आसखेड प्रकल्पातंर्गत चिखली येथे 100 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येणार आहे. गोंडवाना इंजि. लि. यांना 13 सप्टेंबर 2019 रोजी काम देण्यात आले आहे. तसेच देहू पासून चिखली जलशुद्धीकरण पर्यंत पाईपलाईन टाकणेचे काम रुद्राणी इन्फ्रास्ट्रकचर लि यांना 21 नोव्हेंबर 2019 रोजी देण्यात आले आहे.

चिखली येथील गायरान जागेवर जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. तीन टप्प्यात त्याचे काम केले जाणार आहे. गायरान जागेत 1527 झाडे आहेत. त्यापैकी 227 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. कमीत-कमी झाडे तोडावीत. झाडे वाचविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना महापौर माई ढोरे यांनी केल्या.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ”पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचे काम तातडीने सुरु करावे. झाडांचे पुनर्रोपण करावे. जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची मुदत 24 महिन्याची आहे. तथापि, पाणीपुरवठा विभागाने हे काम 12 ते 14 महिन्यामध्ये पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा. शुक्रवारी पुन्हा त्या ठिकाणी केलेल्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे”.

स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी म्हणाले, ”जलशुद्धीकरण केंद्राचे काम शनिवार पासून सुरु करण्यात यावे. ठेकेदारांनी आवश्यक त्या मशिनरी आणून काम चालु करुन एक महिन्याच्या कामाचा बार चार्ट द्यावा. कामाच्या ठिकाणी अडीअडचणी आल्यास संबंधित अधिका-यांशी समन्वय ठेऊन अडी-अडचणी सोडविण्यात याव्यात. यापुढे सदर ठिकाणी कामाच्या प्रगतीबाबत आठवड्यातून दोनवेळा आम्ही पदाधिकारी भेट देणार आहोत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.