Pune : गर्दी टाळण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज – अजित पवार

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी कमी करणे आवश्यक आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. काही ठिकाणी दुःखद घटना घडल्यानंतर अंत्यविधी आणि अन्य विधीच्या वेळी गर्दी केली जाते. लग्न समारंभासाठी गर्दी केली जाते. ही गर्दी टाळून किमान 20-25 माणसांवर हे विधी, समारंभ पार पाडावेत. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी काही पावले उचलायची गरज असेल तर रेडिओ आणि अन्य माध्यमांमधून जनतेशी संपर्क साधला जाईल. कोरोना संदर्भात आवश्यक साधनांची खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. निधीसाठी राज्य सरकार सक्षम आहे. निधीमुळे कुठलीही अडणार येणार नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार म्हणाले, कोरोनाच्या बाबत जिल्ह्याचा आढावा घेत असताना निधीची कमतरता भासू नये, याची काळजी घेतली आहे. आतापर्यंत प्रशासनाकडून 31 मार्च 2020 पर्यंत विविध आस्थापना बंद ठेवण्याचे निर्णय घेतले होते. आता ‘पुढील आदेश येईपर्यंत’ असा त्या आदेशांमध्ये बदल करण्यात आला आहे.

कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून डॉक्टर, नर्सेस आणि अन्य सर्व स्टाफ यांना ब्रेक मिळालेलाच नाही. त्यांना ब्रेक देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. त्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांबाबत देखील हीच अवस्था आहे. त्यासाठी होमगार्डचा पर्याय वापरण्यात येणार आहे. सरकारी अधिका-यांनी दिलेल्या सूचनांचे व्यापा-यांनी काटेकोरपणे पालन करावे. नागरिकांनी आपल्या घरामध्ये थांबून सहकार्य करावे. ऑनलाईन काम करावे, अनावश्यक प्रवास टाळावा. हे सर्व करत असताना घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन देखील त्यांनी केले.

सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा असतो. नागरिकांनी देखील हे स्वतःचे कर्तव्य असल्याचे जाणून सहकार्य करावे. कोरोनाचा तिसरा टप्पा सुरु होत आहे. हा तिसरा टप्पा आणि यापुढील प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याला नागरिकांनी योग्य प्रतिसाद द्यावा.

बस, रेल्वे सुरु ठेवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. सफाई, पाणीपुरवठा, वीज अशा सर्व अत्यावश्यक सेवा देणा-या लोकांनी कामावर यायला हवे, यासाठी या सेवा सुरु आहेत. त्यांनीच केवळ प्रवास करावा. जर यापुढेही गर्दी राहिली, तर परिवहन सेवा बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल. कंपन्यांमध्ये काम करणा-या मजूर, कामगारांना पगार द्यावेत. काही कामगारांचे हातावर पोट असते. त्यांचे हाल होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असेही पवार म्हणाले.

राज्य शासनाकडून तीन महिन्यांचे रेशन मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मॉलमध्ये केवळ भाजीपाला विक्रीचा भाग सुरु राहील. इतर सर्व मॉल बंद राहील. पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. राज्यस्तरावर वेगळा निर्णय झाला असेल आणि एखाद्या जिल्ह्यात किंवा भागात वेगळ्या निर्णयाची आवश्यकता असेल तर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका-यांना तसे अधिकार देण्यात आले आहेत. काही शासकीय कार्यालयात २५ टक्के स्टाफवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मंत्रालयात देखील प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे. वर्क फ्रॉम होमची संकल्पना शासनाच्या देखील काही विभागात राबवण्यात येत आहे. खासगी स्तरावर याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी. ग्रामीण रुग्णालय देखील तयार आहेत. ग्रामपंचायतींना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याबाबत सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होणार नाही.

निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी मिळाली ही न्यायाची बाब आहे. पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. अशा घटना समाजात कुठेही घडू नये, यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत, असेही अजित पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.