Pune : वैभवशाली साहित्याचा नवोदितांनी शोध घ्यावा – प्रा. तुकाराम पाटील

एमपीसी न्यूज : वैभवशाली साहित्याचा (Pune) नवोदितांनी शोध घ्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी केले. स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, पुणे आयोजित स्वयंसिद्धा पुरस्कार 2022 आणि ‘स्वातंत्र्य लढ्यातील साहित्यिकांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद असा कार्यक्रम कॅप्टन कदम सभागृह, सावरकर भवन, प्राधिकरण येथे पार पडला.

त्यावेळी प्रा. तुकाराम पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “स्वातंत्र्यपूर्व काळात तळागाळातील सामान्य माणसांनी स्वातंत्र्य क्रांतीसाठी जो भव्य प्रमाणात उठाव केला, त्यांचे खरे श्रेय लोकसाहित्य, लोककला, संत व तत्सम इतर साहित्याला द्यावे लागेल. या चळवळीत भाग घेणारे आणि हुतात्मे झालेल्याची संख्या मोठी संख्या आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांचा यात सहभाग आहे. स्वातंत्र्य क्रांतिकारकांना ज्यांनी प्रेरणा दिल्या ते साहित्य, पाहिजे तितक्या प्रमाणात प्रसिद्धीस आले नाही. आजही असे साहित्य अनेक कथा, कविता, पोवाडे, ओव्या, भेदीक, नाटके, गणगौळण, धार्मिक पुजा विधी, व इतर अनेक प्रकारच्या प्रासंगिक कार्यक्रमातून उपलब्ध होईल. पण, त्याचे योग्य दिशेने संकलन व संशोधन होणे गरजेचे आहे. ते साहित्य अफाट व वैभवशाली आहे. नवोदितांनी त्याचा शोध घेऊन ते उजेडात आणण्यासाठी जरूर प्रयत्न केले पाहिजेत. तीच हुतात्म्यांना खरी मानवंदना ठरेल”.

यावेळी प्रार्थना अधिवक्ता सदावर्ते (कौटुंबिक समुपदेशिका) व (Pune) सरस्वती काळे (पोलीस कॉन्स्टेबल) यांना स्वयंसिद्धा 2022 या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी राजेंद्र घावटे, धनंजय भिसे, अंजली कुलकर्णी या मान्यवर मंडळींनी परिसंवादामध्ये आपले विचार मांडले.

अंजली कुलकर्णी म्हणाल्या की, “भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्य सैनिक यांच्याबरोबर साहित्यिकांचे देखील मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यलढ्यातील साहित्यिक म्हणजे, कवी मोहम्मद इकबाल, वंदे मातरम हे गीत लिहिणारे बंकिमचंद्र चॅटर्जी, महाकवी रवींद्रनाथ टागोर यांनी आपले राष्ट्रगीत लिहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली ‘मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, स्वतंत्रते भगवती’ यासारखे ही गीते लोकांच्या मनामनात जाऊन बसलेली आहेत. साने गुरुजी कविमनाचे, हळवे होते. त्यांनी ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’ असे मंगलमय उद्गार काढले.

स्वातंत्र्यलढयाविषयी ज्या साहित्यकांनी आपलं योगदान देऊन स्वातंत्र्यलढ्यामध्ये चैतन्य निर्माण केलं. लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली, स्वातंत्र्याचे भावना जागवली. लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधी महाकवी रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू अशी कितीतरी समोर येतात. हिंदी भाषेमध्ये रामधारी सिंह दिनकर, मैथिलीशरण गुप्त, मुंशी प्रेमचंद, रामप्रसाद बिस्मिल, सुभद्रकुमारी चौहान अशा अनेकांनी वाचकांमधील देशभक्तीची भावना चेतवली.

कवी श्यामलाल गुप्ता यांनी ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा’ हे विख्यात गीत लिहिले. ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे म्हणाले की, “भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात साहित्यिकांचे योगदानामुळे क्रांतीकारकांना बळ मिळाले. परचक्राच्या गुलामगिरीमधून देशाला मुक्त करण्यासाठी चेतना मिळाली. मरगळलेल्या समाजाला जागे करण्याचे काम साहित्यिकांनी केले. यामध्ये राष्ट्रभक्तीवर गीते, उस्फुर्त काव्यरचना, कथा कादंबऱ्या तर होत्याच पण पोवाडे, आरत्या, भजने, भारुडे, मेळे, प्रभात गीते, वृत्तपत्र लेख, पत्रके, व्याख्याने,चरित्र, भाषणे आदींचाही (Pune) तत्कालीन जनमानसावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला.

Pune : कलापिनीची नाट्यवाचन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी ब्रिटिश राष्ट्रवाद रुजवण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी त्यांचे राष्ट्रगीत गाण्याची सक्ती निर्माण झाली. त्याला उत्तर म्हणून अजीमुल्लाह खान यांनी राष्ट्रप्रेरणा गीताची निर्मिती केली. शाहीर अमर शेख, पठ्ठे बापूराव, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर, सिद्राम मुचाटे भिकाजी गायकवाड यांच्या पोवाड्यांनी समाजमन ढवळून निघाले. केसरी, मराठा, दिनबंधु, मूकनायक, काळ, सुधारक, दर्पण, ज्ञानप्रकाश अशा वृत्तपत्रातील लिखाणाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोठे आहे.

अनेक साहित्यकृती मौखिक स्वरूपामध्ये होत्या. त्याचे निर्माते अज्ञात असले तरी समाजात खोलवर प्रभाव निर्माण करणाऱ्या होत्या. अनेक साहित्यिकांवर आणि साहित्यावर ब्रिटिशांनी बंदी आणली होती. काहींना तुरुंगवासही भोगावा लागला होता.  डॉ. धनंजय भिसे म्हणाले की, “साहित्य हे काही अंशी कल्पनाप्रधान असले तरी त्याची निर्मीती वास्तवाच्या पार्श्वभूमिवर होत असते. साहित्यिक हा त्या त्या काळाचा भाष्यकार असतो. वास्तवातील घटना-प्रसंगांची निवड करून त्यांची एक योग्य अशी रचना करून साहित्यनिर्मिती तो करत असतो. साहित्यिक हा समाजाला सांस्कृतिक दिशा देणारा असतो. साहित्यिकाचे साहित्य हे समाजमन घडवत असते.

स्वातंत्र्यपूर्व कालखंडात स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये क्रांतिकाराबरोबरच भारतीय समाजमनाला महत्त्वपूर्ण घडवण्याचं कार्य तत्कालीन बहुतांश साहित्यिकांनी केलेले आहे. पारतंत्र्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही निर्भीड साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यचळवळीला पुरक असं वातावरण निर्माण केले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या एकूण चळवळीला गतिमानता प्राप्त झाली. साहित्यनिर्मिती ही सांस्कृतिक घटना जरी असली तरी ती सांस्कृतिक घटना ही सामाजिक व राजकीय क्रांतीला कारणीभूत ठरत असते.

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत साहित्यिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आज आम्ही स्वातंत्र्यात आहोत. या स्वातंत्र्यात राजकारणांच्या नावाखाली पातळी सोडून एकमेकांवर चिखलफेक करत आहोत. ती आमची संस्कृती नाही. आमची संस्कृती ही विचारांची आहे. सहिष्णुतेची आहे. म्हणून विचारांची लढाई ही विचारानेच करण्याची गरज आहे. पुढे ते म्हणाले ”स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील स्वातंत्र्यचळवळीच्या अनुषंगाने मुद्रित साहित्य हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पण देशातील सर्वसामन्य माणूस व खालच्या वर्गातील दिनदुबळा समाजाने स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी ही मौखिक वाङमयाची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली होती. त्याच्या खुणा काही ठिकाणी आजही सापडतात. त्या मौखिक वाङमयाचे संकलन करुन समाजासमोर उपलब्ध करुन देणे तितकचं गरजेचं आहे.

स्वयंसिद्धा पुरस्कार स्वीकारताना प्रार्थना सदावर्ते म्हणाल्या की, मी कौटुंबिक समस्यांसाठी गेल्या 35 वर्षात केलेल्या समुपदेशनाच्या कामाची दखल स्वयंसिद्धा प्रतिष्ठानने या पुरस्काराच्या निमित्ताने सर्वप्रथम घेतली. माणूस माणसास जोडण्याचे आणि कुटुंब कुटुंबास जोडण्याचे सांदिफटीतील काम समुपदेशनातून करावे लागते. हे काम लक्षात येत नाही, पण अत्यंत क्लिष्ट आणि अवघड आणि महत्त्वाचे असते. या कामासाठी मला पुरस्कृत करून या कामाला स्वयंसिद्धा प्रतिष्ठानने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.

सामाजिक – साहित्यिक संस्थेने माझ्या या कामाची दखल पहिल्यांदा घेतली गेली. यावेळी विनिता ऐनापुरे, शोभा जोशी, राधाबाई वाघमारे, अशोक कोठारी, प्रदीप गांधलीकर, कैलास भैरट, प्रशांत पोरे, संदीप जाधव, अभिजित काळे, अंतरा देशपांडे ही आणि इतर मान्यवर मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती. संस्थेच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी संस्थेचे उद्देश सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे यांनी केले. मानपत्राचे वाचन जयश्री गावंडे यांनी केले व सूत्रसंचालन वर्षा बालगोपाल यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.