Pune News : शिवजयंतीनिमित्त साकारली 40 फुटांची रांगोळी, मोडी भाषेत छत्रपतींचा 500 वेळा नामोल्लेख

0

एमपीसी न्यूज – अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज (दि.19) सर्वत्र साजरी केली जात आहे. मोडी गर्ल म्हणून ओळख असलेल्या श्रुती पठारे-पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची 40 फूट लांबीची रांगोळी साकारत महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे. छत्रपती  शिवाजी चौक, चंदननगर -खराडी याठिकाणी ही रांगोळी काढली आहे. विशेष म्हणजे या रांगोळीत मोडी लिपीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुमारे 500 वेळा नामोल्लेख करण्यात आला आहे.

श्रुती पठारे-पाटील यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले की, गुरूवारी (दि.18) रात्री 8 वाजता रांगोळी काढण्यास सुरुवात केली आणि आज (शुक्रवारी) पहाटे 6.00 वा. रांगोळी पूर्ण झाली. या रांगोळीसाठी जवळपास 40 किलो रांगोळीचा वापर झाला. रांगोळीत राजमुद्रेत महाराजांचा चेहरा साकरला असून सभोवती सुमारे एक हजार वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मोडी भाषेत लिहण्यात आले आहे. तसेच रांगोळीची कडा देखील मोडी लिपीची स्वर व्यंजने वापरून पूर्ण केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

मोडीची आवड होती आणि त्यासाठी काहीतरी करायची इच्छा होती. नुकतेच लग्न झाले होतं माझे पती अक्षय पठारे यांनीही यासाठी प्रोत्साहन दिलं. मोडी लिपी महाराजांच्या काळापासून वापरली जाते ती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी या कार्यक्रमाचा प्रस्ताव आम्ही ठेवला व तो राबवला असे त्या म्हणाल्या. सुरेंद्र पठारे युवा मंच आणि राजाधिराज प्रतिष्ठान यांच्या वातीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असे श्रुती पठारे-पाटील यांनी सांगितले.

श्रुती पठारे-पाटील या मुळच्या चिंचवडच्या रहिवासी असून, त्यांनी अ‍ॅप्लाईड आर्टस् या विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्या मोडी लिपीकडे वळाल्या, चिंचवडमध्ये त्यांची ‘मोडी गर्ल’ अशी ओळख होती. तीच ओळख पुढे घेऊन जात लोकांमध्ये मोडी बद्दल प्रेम निर्माण करयाची इच्छा असल्याचे पठारे यांनी सांगितले. या रांगोळीसाठी कला दिग्दर्शन सागर कुंभार, आकाश हुमने व यश शिंदे यांनी केले. तसेच, मयूर झेंडे, शुभम पठारे, ओंकार पठारे यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.