Pune News : 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज : भारतीय संगीत आज जागतिक मंचापर्यंत पोहचले (Pune News) म्हणूनच कलेकडेसुद्धा डोळसपणे पाहिले पाहिजे. काळानुरूप काही गोष्टीवर उलट विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. कलाकार आणि श्रोते या दोघांची ही जबाबदारी आहे आणि आपण ती चांगली पार पडली आहे, अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या समारोपाच्या सत्रात डॉ. अत्रे यांनी स्वरमंचावरून श्रोत्यांशी संवाद साधला.

“मी किराणा घराण्याची आहे, याचा मला खूप अभिमान आहे. उस्ताद करीम खान यांच्यापासून भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी संगीतास समृद्ध केले आहे,” असे सांगत डॉ. अत्रे म्हणाल्या, की “संगीत हे केवळ शास्त्र नाही, कसरत, करामत अथवा मनोरंजन नाही, तर या जगातील सुंदर, मंगल शाश्वत जे आहे, त्याची जाणीव करून देणारा माध्यम आहे. संगीत परंपरेत काळानुरूप जे बदल झालेत, ते बदल शास्त्र आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून, त्याप्रमाणे मी बदल करत आले आहे. त्याला विरोध होणे स्वाभाविक होते. पण त्यामध्ये नव्याने विचार सुरू होईल, अशी मला खात्री आहे.”

भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारात सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सवाचे (Pune News) मोठे योगदान आहे,असेही त्यांनी सांगत त्यांनी राग भैरवी’ने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यामध्ये तराणा व ‘जागी मै सारी रैन’, ‘जगत जननी भवतारी मोहिनी तू नवदुर्गा…’ ठुमरी सादर केली.

त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), माधव मोडक (तबला), आरती ठाकूर – कुंडलकर, आश्र्विनी मोडक (तानपुरा), डॉ.चेतना बनावट व अतींद्र तरवडीकर (गायन) यांनी साथ केली.

तत्पूर्वी महोत्सवाच्या पाचव्या दिवशी उत्तरार्धातील दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी आपल्या भावस्पर्शी कथक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या ‘श्रीराम स्तुती’ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कथक सादरीकरणासोबतच त्यांची ऊर्जा, हावभाव यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर रूपक तालात सात मात्रा, धमार तालमध्ये 14 मात्रा, 2 स्वरचित रचना, चक्रधार पढंत त्यांनी सादर केल्या.

धीरगंभीर अशा ‘श्रीराम कथा’ सादरीकरणाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीचा समारोप केला. त्यांना झुबेर शेख (सतार), पं. कालिदास मिश्रा (तबला), वैभव मानकर (हार्मोनियम व गायन), वैभव कृष्ण (पढंत), भुवन (बासरी) यांनी साथ केली.

महोत्सवाच्या परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व यांच्या ‘बिन देखे पडे नही चैन’ या भैरवीचे रेकॉर्डींग ऐकून 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता करण्यात आली.

Melodies of Asha Bhosale : आशा भोसले यांच्या सदाबहार गीतांचा खजिना सादर करीत दृष्टी बलानीने केले रसिकांना मंत्रमुग्ध 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.