Pune News : पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांच्या थकबाकीचा ८५०४ कोटींचा डोंगर

एमपीसी न्यूज – वारंवार आवाहन व विनंती करून देखील भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहक व कृषिपंपाच्या वीजबिलांची थकीत रक्कम तब्बल 8 हजार 504 कोटी 86 लाखांवर गेली आहे. वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक घडी विस्कटल्याने व अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे.

सद्यस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील 24 लाख 8 हजार 209 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे 1023 कोटी 32 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 7 लाख 39 हजार 909 कृषिपंपधारक शेतकऱ्यांक 7 हजार 481 कोटी 54 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वाढतच असल्याने तसेच कृषिपंपांच्या चालू वीजबिलांचा देखील भरणा होत नसल्याने नाईलाजाने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महसुलासाठी अन्य कोणताही मुख्य स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्रामुख्याने वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच महावितरणची आर्थिक मदार आहे. मात्र, वीजबिलांच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने सद्यस्थितीत वीजखरेदीदैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्चकर्जांचे हप्तेकंत्राटदारांची देणीआस्थापनांचा खर्च भागविण्यासाठी महावितरणची तारेवरची कसरत सुरु आहे. त्यामुळे नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याचा कटू कारवाई सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विजेची वाढती मागणी 20 हजार ते 21 हजार 500 मेगावॅटवर स्थिरावली आहे. परंतु, आर्थिक संकटात असताना देखील महावितरणकडून विजेच्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात येत आहे, हे उल्लेखनीय.

सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यात 11 लाख 3 हजार 315 ग्राहकांकडे 542 कोटी 82 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर सातारा जिल्ह्यात 2 लाख 27 हजार 484 ग्राहकांकडे 52 कोटी 19 लाख, सोलापूर जिल्ह्यात 3 लाख 37 हजार 563 ग्राहकांकडे 132 कोटी 52 लाख, कोल्हापूर जिल्ह्यात 4 लाख 38 हजार 982 ग्राहकांकडे 187 कोटी 79 लाख आणि सांगली जिल्ह्यात 3 लाख 865 ग्राहकांकडे 107 कोटी 92 लाख रुपयांची थकबाकी आहे.

यासोबतच कृषिपंप वीज धोरणामधून पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 12 लाख 44 हजार 687 कृषिपंपधारक शेतकऱ्यांना थकबाकीमध्ये एकूण 2643 कोटी रुपयांची महावितरणकडून निर्लेखनद्वारे तसेच विलंब आकार, व्याजातून सूट देण्यात आली आहे. या शेतकऱ्यांकडे आता सुधारित 8 हजार 175 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातील 50 टक्के थकबाकी येत्या मार्च 2022 पर्यंत चालू वीजबिलासह भरल्यास उर्वरित 50 टक्के थकबाकी देखील माफ होणार आहे. आतापर्यंत 5 लाख 4 हजार 778 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. चालू वीजबिलासह या शेतकऱ्यांनी 687 कोटी 82 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. यामध्ये त्यांना भरलेल्या थकबाकीएवढी म्हणजे 346 कोटी 73 लाख रुपयांची अतिरिक्त सूट मिळाली आहे.

या कृषी वीज धोरणाचा लाभ घेत पश्चिम महाराष्ट्रातील 1 लाख 67 हजार 126 शेतकऱ्यांनी चालू वीजबिलाचे 80 कोटी 80 लाख आणि सुधारित थकबाकीचे 250 कोटी 29 लाख रुपयांचा भरणा करीत वीजबिलातून थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या सर्व थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्यांचे त्यांनी भरलेल्या थकबाकीएवढेच म्हणजे 250 कोटी 29 लाख रुपयांची रक्कम देखील माफ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.