Pune News :  नळस्टॉप चौकातील वाहतुककोंडी फोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

एमपीसी न्यूज –  दुहेरी उड्डाणपुलानंतरही कर्वे रस्त्यावर नळस्टॉप चौकातील वाहतुक कोंडीत सुटण्याचे नाव घेत नाही. या उड्डाणपुलामुळे उलट वाहतुककोंडीत भरच पडत आहे. यातुन मार्ग काढण्यासाठी महापालिका, वाहतुक पोलिस आणि मेट्रो प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून प्रायोगिक तत्वावर काही उपाय राबविण्यात येणार आहेत.

 

नळ स्टॉप चौकातील वाहतुककोंडी सोडविण्यासाठी या चौकात मेट्रो मार्ग आणि इतर वाहनांसाठी एक असा दुपदरी उड्डाणपुल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले असून पुलाच्या दोन्ही बाजूंना सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. तयार केलेला उड्डाणपुल चुकल्याने वाहतुक कोंडी होत असल्याचे निरीक्षण वाहतुक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

या वाहतुककोंडीतून मार्ग काढण्यासाठी महापालिकेचा वाहतुक नियोजन विभाग आणि वाहतुक पोलिस यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली. यात संयुक्तपणे उपाय करण्याचे ठरले. नळस्टॉप चौकात यु टर्न करण्यास परवानगी देण्यात येणार आहे, तसेच कर्वे रस्त्याला एसएनडीटी येथे येऊन मिळणारा एक छोटा रस्ता थेट कालव्यावरील रस्त्याला जोडण्याच्या उपायावर चर्चा झाली. तसेच नळस्टॉप ते एसएनडीटी या भागात असलेल्या बसथांब्याचे नियोजन करण्याबरोबरच एसएनडीटी येथून पौड रस्ता आणि कर्वे रस्ता या दोन्ही दिशेने जाणार्‍या बसेसकरीता वेगवेगळे बसथांबे करण्याबाबत चर्चा झाली.

दुहेरी उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला केला तरी लगेच या भागातील वाहतुक कोंडी सुटणार नाही. मेट्रोचे काम अद्याप सुरु आहे, काही ठिकाणी बांधकामाचा राडारोडाही पडलेला आहे, या उड्डाणपुलाच्या परीसरात कर्वे रस्त्याला येऊन मिळणार्‍या छोट्या रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. अशा काही उपाययोजना केल्यानंतरच येथील वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास महापालिका प्रशासनाला आहे.

दुकानांसमोर वाहने पार्क केल्यानंतर वाहतुक कोंडीत भर पडते. त्यामुळे पुलाखालील जागा पे अँड पार्क तत्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी या भागातील दुकानदार, व्यापार्‍यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदनही दिले आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.