Pune News : पुण्यातील कोरोना आटोक्यात का येत नाही : अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापझापले

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पुण्यातील रुग्णसंख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यात 1 लाख 63 हजार  71 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

एमपीसी न्यूज – अधिकाऱ्यांना मनासारखे पोस्टिंग दिले, त्यांच्या म्हणण्यानुसार जम्बो हॉस्पिटल बांधले, निधीची काहीही कमतरता भासू देणार नाही, असे सांगूनही पुण्यातील कोरोनाचे संकट आटोक्यात का येत नाही, रोज कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे वाढते प्रमाण यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळीच वरीष्ठ अधिकाऱ्यांना झापझापले. 

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पुण्यातील रुग्णसंख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यात 1 लाख 63 हजार  71 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 38  हजार 536 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.27 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.05  टक्के आहे.

कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणावरुन अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची आज चांगलीच कानउघाडणी केली. दर आठवड्याला मुक्काम ठोकणारे अजित पवार आज कमालीचे संतप्त झाले होते, अशी माहिती उपस्थितांकडून मिळाली. पुण्यातील कोरोना आटोक्यात येत नसल्याने तसेच दुसरीकडे विरोधी पक्षांनीही अजित पवार यांना टार्गेट केले आहे.

यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तब्बल 3 दिवस पुण्यात मुक्काम ठोकला होता. नंतर अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. नागरिकांमध्ये कोरोना संदर्भात पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही जनजागृती नाही. अधिकारी वारंवार तेच ते उत्तरे देत असल्याने शरद पवार आणि अजित पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.