Pune News : शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पद्धतीने वितरण प्रक्रिया सुरु

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन विभागात शिकावू अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्याची प्रणाली सुरु करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविली आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम 11 नुसार शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहित केलेली परीक्षा अनिवार्य आहे. त्यामुळे जबाबदार वाहनचालक निर्माण होण्यास मदत होते. या प्रणालीचा वापर करताना पालकांनी आपल्या पाल्यास या परीक्षेचे महत्त्व पटवून द्यावे तसेच या प्रणालीचा गैरवापर होणार नाही याची जाणीव करुन द्यावी. ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणाऱ्या अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्ती यांच्यावर आवश्यक ती पोलीस कारवाई करण्याच्या सूचना संबंधित मोटार वाहन निरिक्षक/ सहा. मोटार वाहन निरिक्षक यांना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार मोटार वाहन कायदा कलम 19 इ अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र ठरेल.

त्याचबरोबर जी महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, इंटरनेट कॅफेविरुद्ध पोलीस विभाग यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास स्थानिक उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांच्याकडे तक्रार करावी. तसेच प्रणालीमध्ये येणा-या आधारकार्ड क्रमांक, त्यावरील माहिती फोटोग्राफ हे सारथी प्रणालीवर चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित होत असल्यास अथवा नसल्यास काही अडचणींसाठी राष्ट्रीय सूचना केंद्र दिल्ली व पुणे यांच्याशी समन्वय साधून त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.