Pimpri News: अण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीकोनामुळेच शहर देशात नावारुपाला आले : महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुधारणा आणि मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी मुहुर्तमेढ रोवणा-या दिवंगत खासदार अण्णासाहेब मगर यांनी पिंपरी-चिंचवडनगरीच्या जडणघडणीची पायाभरणी केली. औद्योगिकरणाला चालना देऊन महापालिकेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन दिले. त्यांच्या दूरदृष्टीकोनामुळेच आज पिंपरी-चिंचवड शहर देशात नावारुपाला आले असल्याचे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.

अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मगर यांच्या प्रतिमेस तसेच प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास महापौर ढोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पदाधिकारी सुरेश गारगोटे, सामाजिक कार्यकर्त्या सीमा काळभोर उपस्थित होत्या.

महापौर ढोरे म्हणाल्या, सहकार क्षेत्रासह शेतकरी, कामगार आणि समाजातील सर्व घटकांसाठी अण्णासाहेब मगर यांनी भरीव कार्य केले. पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणा-या अण्णासाहेब मगर यांनी शहरातील नागरिकांसाठी शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक दवाखाने, उद्याने इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

अण्णासाहेब मगर यांनी शहरविकासाची दाखविलेली दिशा पिंपरी-चिंचवडसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.