Pune News: भाजपकडून ‘त्या’ एका जागेवर अजित पवार यांचा उमेदवार पराभूत

एमपीसी न्यूज: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या त्या एका जागेवर भाजपचा उमेदवाराचा विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेले  प्रदीप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव केला. विशेष म्हणजे प्रचारादरम्यान स्वतः अजित पवार यांनी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचा आवाहन केलं होतं. त्यानंतर ही राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव झाला.

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील चांदेरे हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत. या निवडणुकीत बँक पतसंस्थांसाठीचा ‘क’ गट आणि हवेली मुळशी तालुक्यातील’ अ ‘वर्ग सोसायटी गटातील निकालाबद्दल मोठी उत्सुकता होती.

अनेक वर्षांपासून या बँकेवर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 21 पैकी 21 जागा होत्या. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उरलेल्या सात जागांसाठी रविवार, दोन जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.