Pune News : एल्गार परिषद प्रकरणी शर्जिल उस्मानी विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, भाजपकडून मागणी

एमपीसी न्यूज : एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानी याने प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्वरित अटक करावी, या मागणीचे निवेदन महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि फिर्यादी प्रदीप गावडे यांनी बुधवारी दिले.

पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाणे येथे काल मंगळवारी गुन्हा दाखल केला गेला आहे.

त्या पार्श्वभूमीवर आज महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि फिर्यादी प्रदीप गावडे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी समाजात तेढ निर्माण करणारे शरजील उस्मानी यांचे विधान आहेत. त्या व्यक्ती विरोधात देशद्रोहसारखा गंभीर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी. त्याच बरोबर एल्गार परिषदेचे आयोजकांची चौकशी करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले पाहिजे. यापुढील काळात अशा प्रकाराची परिषद होता कामा नये, अशी मागणी देखील पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कडे करण्यात आली आहे.

स्वारगेट येथील एल्गार परिषदेत शर्जिल उस्मानी प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.