Pune News: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुणेकरांच्या सोयीसाठी जम्बो रुग्णालय उभारून दाखवले- दीपाली धुमाळ

रोज 1500 च्या वर रुग्ण वाढत असताना जम्बो रुग्णालयाची गरज होती. मात्र, भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी या रुग्णालयाचेही राजकारण केले.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घोषणा करून तातडीने जम्बो रुग्णालय उभारून दाखवले. या रुग्णालयामुळे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार असल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सांगितले. 

अजित पवार यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड आणि बाणेर भागांतही जम्बो रुग्णलयाचेही काम पूर्ण झाले असून, लवकरच त्याचे उद्घाटन होणार असल्याचे धुमाळ म्हणाल्या.

पुणे शहरात 82 हजारांच्या वर रुग्ण गेले आहेत. तर, 65 हजार नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन या आजारावर मात केली आहे. रोज 1500 च्या वर रुग्ण वाढत असताना जम्बो रुग्णालयाची गरज होती. मात्र, भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी या रुग्णालयाचेही राजकारण केले.

केवळ पुणे महापालिकाच कोरोनाच्या काळात काम करीत असल्याचा दिखाऊपणा केला. राज्य शासन काहीच करीत नसल्याचे खोटेनाटे आरोप केले. पण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केवळ आपल्या कामाकडे लक्ष दिले. त्यामुळेच हे जम्बो रुग्णालय पुणेकरांच्या सेवेत सुरू झाले आहे.

कोरोना रोखण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आठवड्याला सातत्याने कोरोना संदर्भात आढावा घेत असतात. त्यांच्या सूचनांकडेही सत्ताधारी लक्ष देत नाहीत, असा आरोपही दीपाली धुमाळ यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) 800 खाटांचे हे सुसज्ज कोविड रुग्णालय अठरा दिवसांच्या अत्यंत कमी वेळेत बांधून पूर्ण केले आहे.

पुण्‍यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 32 हजार चौरस मीटर मैदानावर हे 13 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयात 600 खाटा संपूर्णपणे वातानुकूलित असून दोनशे खाटा या आयसीयूसाठी स्वतंत्रपणे राखीव असतील. गेल्या 18 दिवसांत जरी सातत्याने पाऊस होत होता तरी हे रुग्णालय वेळेत व सुसज्ज असे बांधून पूर्ण झाले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.