Pune News : ‘पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा’

उपमुख्यमंत्री अजित पवार : पुणे जिल्हा परिषदेकडून 406 पर्यटन केंद्र निश्चित

केंद्र आणि राज्याचा अधिकाधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न करा

एमपीसीन्यूज : पुणे जिल्हयाच्या पर्यटन विकासासाठी बृहत आराखडा तयार करुन जिल्हा परिषदेकडून निश्चित करण्यात आलेल्या 406 पर्यटनस्थळांचा अभ्यास करा. तिथे कोणकोणत्या सुविधा उभा करता येतील यावर विचार करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पर्यटन विकासाच्या आढावा बैठकीत केल्या.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, ॲड. वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, ॲड. अशोक पवार, संजय जगताप, सुनिल टिंगरे, सुनिल शेळके, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, दिलीप मोहिते तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या निधीचे नियोजन करा. पर्यटनस्थळांवर मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करा. पर्यटन विकासासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कार्यशाळा घेऊन तज्ञांचे मार्गदर्शन घ्या, असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, खासदार वंदना चव्हाण आणि सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने सुरु होणारा हा प्रकल्प स्तुत्य असून त्याबाबतीत जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन.

परंतु, काम लोकांच्या सुविधेत भर पाडणारे व दर्जेदार असावे. पुणे जिल्हयात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी पार्कींग व्यवस्था असावी. तसेच पर्यटनाच्या ठिकाणी चुकीचे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. जुन्नर तालुक्याप्रमाणे अन्य तालुके पर्यटनस्थळे घोषित होण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही ते पुढे म्हणाले.

यावेळी जिल्हयातील 406 पर्यटनस्थळांच्या जमिनीची मालकी व कार्यरत मनुष्यबळ, लोणावळा येथील नियोजित नावीन्यपूर्ण पर्यटन उपक्रम, पिंपरी चिंचवडमधील पर्यटनस्थळे, किल्ले सिंहगड विकास, भीमाशंकर येथील अतिक्रमण धारकांसाठी अल्पोपहार केंद्र उभारणी, अतिक्रमण धारकांसाठी केलेली प्रस्तावित उपाययोजना,पुरातत्त्व विभाग, जिल्हयातील विशेष पर्यटन क्षेत्र, महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन विकास, कृषी पर्यटन, पर्यटनातून रोजगार निर्मिती, गड किल्ले पर्यटन विकास आदींबाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी पर्यटन विकास, पुरातत्व् विभाग, जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्हयाचे अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.