Pune News: खळबळजनक ! बंद घरात सापडला पुरुष आणि महिलेचा मृतदेह, हत्या की आत्महत्या तपास सुरू

​एमपीसी न्यूज ​: पुण्याच्या मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका बंद घरात पुरुष आणि महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंढवा येथील केशवनगर परिसरातील कुंभारवाडा येथे हा प्रकार उघडकीस आला. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शरद भुजबळ (वय 47) आणि हेमा (वय 43) असे मृतदेह आढलेल्या दोघांची नावे आहेत. यातील शरद हा एका ट्रॅव्हल्स मध्ये चालक म्हणून कामाला होता. तर मयत महिला हेमा या नेपाळी आहेत. शरद याच्याशी संपर्क होत नसल्याने मित्र परवेज आलमने घरी येऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता मृत्युमुखी पडलेल्या शरद आणि हेमा यांच्या नाकातुन रक्त येत असल्याचं दिसून आले. दोघांचेही मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

मुंढवा पोलिसांनी या घटनेची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. या दोघांचाही मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या दोघांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.