Article by Harshal Alpe : जागतिक मराठी रंगभूमी दिन चिरायू होवो!

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) – मागील दोन वर्षांपासून रंगभूमी हा शब्दच तसा दुरापास्त झाला होता. त्याच्याशी निगडीत परंपरा या इतिहासजमाच व्हायला लागल्या होत्या. रंगभूमीवर कार्यरत पिढीच्या पिढी खिडकीकडे आशेने बघत होती, फक्त बघत होती अन उसासे सोडत होती.

काहींना जगण्याचा प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हता. आपण नाकारले गेल्याची, उपेक्षित असल्याची भावना मनात उभारी धरत होती. फक्त स्वप्नातच येणारे ते नाट्यगृहांचे ते बंद दरवाजे उघडता उघडता मनाला प्रचंड वेदना देत होते . “काम करायचे आहे पण”? या पण मध्येच खूप मोठे प्रश्नचिन्ह येत होते. इतर क्षेत्रांमध्ये आणि या रंगभूमीच्या पवित्र क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाची मानसिकता आणि काही अंशी कोती मनोवृत्ती ही याच काळात अनुभवायला मिळाली .

ती अशी की इतर वेळी या क्षेत्राबद्दल आपल्या मराठी सामान्य माणसाला प्रचंड अभिमान वगैरे असतो. संस्कृती बद्दल, जुन्या रंगभूमीच्या अनेक पराक्रम गाथा ही आपण लोक अगदी चवीचवीने सांगत आणि ऐकत असतो. गंधर्वांची ती नाटके, ती पदे किती तल्लीन होऊन ऐकायचो. पणशीकरांची नाटके, अत्र्यांची नाटके आणि इतर बर्‍याच मोठ्यांची नाटके कशी आम्ही पहिल्या रांगेतून पाहिली आणि त्या आठवणी आज ही कश्या आमच्या मनात घर करून आहेत याचे रंजक किस्से ही आपण चांगलेच रंगवतो.

काही लोक तर त्यांच्या आजोबांनी, वडिलांनी कसे या मातब्बर नटांबरोबर सुरुवातीच्या काळात रंगभूमीवर काम केले होते हे ही सांगतात, ती सुवर्ण परंपरा आहे. मान्य पण, जेव्हा आता रंगभूमी ठप्प झाली आणि जेव्हा आमचे रंगकर्मी पोटा पाण्यासाठी इतर गोष्टी , मन मारून काम करू लागले , तेव्हा हीच मराठी माणसे “बर आहे , “ती फालतू नाटके करण्यापेक्षा हे करतोयस ते बर आहे” अशी प्रतिक्रिया देतात तेव्हा कीव येते.

अशावेळी या मानसिकतेचा मनस्वी संताप सुद्धा येतो. यांच्या मनोरंजनासाठी आम्ही रंगकर्मी अक्षरश: रक्ताचे पाणी पाणी आटवतो आणि त्या बदल्यात मिळणारा मोबदला हा प्रत्येकच वेळी जास्तच असेल अस नाही, तो कमीच असतो, कायमच ! आणि हे आम्हालाच सांगणार आणि आमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटकाला हिणवणार, फालतू म्हणणार, का ?

काही लोकांना नाटक करणे ही इतकी सोपी गोष्ट वाटते की ते म्हणतात सुद्धा की “काय चार बिन कामी चार टाळकी एकत्र झाली की झाले तुमचे नाटक , नाटक करण्यासाठी अजून काय लागते आहे ?” एवढी दर्जेदार विद्यापीठे नाट्यशास्त्रावर अभ्यास करणारी त्यातून आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या रंगभूमीकडे आदराने बघून त्यावर अभ्यास करणारे नामवंत होऊन सुद्धा आमची मानसिकता इतकी तोकडी असावी?

आज प्रत्येकच आई बापाला आपल पोरगं जर अभिनय करायच म्हणत असेल तर डायरेक्ट सुपरस्टार करायच स्वप्न पडत असतं, त्यासाठी ते दिसेल त्या शिबिरात ,डान्स क्लास ला घालत असतात , तिथे त्या गुरु ला “आमच्या पाल्याला सिनेमात , सिरियल मध्ये तर काम मिळेल न ?” अस विचारून भंडावून ही सोडत असतात. फायनल परफॉर्मन्स च्या वेळी कौतुकाने आपल्या इतर नातेवाईकांना ही नाट्यगृहावर घेऊन येतात आणि आपल्या पाल्यावर कौतुकाचा वर्षाव करतात इतका करतात की त्या पाल्याला आपण आकाशात गगनभरारीच मारतोय असा भास होतो.

त्या पाल्याला त्या कौतुकामुळेच त्या नाट्यगृहाचे आकर्षण अधिकच वाटायला लागते याचा कोणीच विचार करत नाही आणि जे पालक आपल्या पाल्याचे कौतुक ही करत नाहीत ती पाल्ये सुद्धा कमीपणावर मात करण्यासाठी आणि आणि आपल्या पालकांच्या चेहेर्‍यावर कौतुक पाहाण्यासाठी रंगभूमीची कास त्वेषाने धरतात .

या रंगभूमीवर एक गोष्ट फारच उच्च दर्जाची असते आणि ती म्हणजे पडद्याच्या मागे सगळेच समान पातळीवर असतात. इतर कुठल्या ही क्षेत्रात थोड्याफार फरकाने सीनियर ज्युनिअर हा भेद असतोच असतो मात्र इथे किती ही अनुभवी असला तरी जेव्हा काम सुरू होते तेव्हा येणारे दडपण आणि होणारे काम हे नवोदित आणि अनुभवी यांच्यातली भिंत फोडून टाकते.

मायबाप प्रेक्षकांसाठी दोघे ही फक्त त्या कथेतले एक पात्र असतात आणि प्रेक्षक फक्त ती कथा पाहात असतात. हेच रंगभूमीचे महान वैशिष्ट्य आहे , त्या दिव्यांनी उजळलेल्या आणि ब्लॅक आऊट मध्ये खरंतर आपण सगळेच आपलेच अस्तित्व या जगाच्या पटलावर शोधत असतो , फालतू नाटके काय , किंवा चांगली नाटके काय , दोन्ही ही आपल्याच आयुष्याभोवतीच फिरत असते ना !

ही रंगभूमी चिरायू होवो असे म्हणायचे आहे , कारण ही बंद होती पण ही आपल्या सगळ्यांच्याच अवतीभवती होती ना ! आपल्या सगळ्यांचीच मने गेली दोन वर्ष चार भिंतीत बंदिस्त झाली होती  ती आता उघडत आहेत आणि ती 100% अजून उघडायची आहेत. ती ज्यावेळी उघडतील त्यावेळी ती रंगभूमी चिरंजीवच असेल एवढी खात्री वाटते. नकारात्मकता सोडा राव , आणि या रंगभूमीकडे आणि शोधा आपले अस्तित्व आपल्या आवडत्या नाटकात ,गाण्यात आणि या ललित कलेत ….

अहो ! देव सुद्धा या कलेला उच्चत्तम मानायचे तर आपण कोण पामर ? या रंगभूमीची पूजा करूया आणि त्याची सेवा करणार्‍या रंगधर्मियांना पुजारी समजून त्यांना ही या समाजात मानाचे स्थान देऊया.

निदान एवढे तरी आपण करूया ना !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.