Pimpri : अभिनयाचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्याविषयीची केबीसीच्या सेटवरील अविस्मरणीय आठवण

एमपीसी न्यूज ( स्नेहल रेडीज ) – आम्हाला म्हणजे मला ,माझ्या नणंदेला आणि तिच्या मिस्टरांना( हे दोघं कोल्हापूर वरून आले होते) केबीसीच्या ऑडियन्समध्ये जाण्याचा योग माझी भाची लक्षदामुळे आला. तिथे गेल्यावर अमिताभ बच्चन यांच्या सहज वावरण्याने जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली, तिचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे.

आम्हाला केबीसी च्या शूटिंगसाठी साडेचार वाजताची वेळ मिळाली होती. त्याची तयारी आम्ही दोन दिवस करत होतो . त्यांनी विशिष्ट ड्रेस कोड सांगितला होता. अमिताभ बच्चन यांच्या तीस चित्रपटांची नावे गुंफून आम्ही एक पोस्टर तयार केले होते. गोरेगाव फिल्म सिटीला शूटिंग होते. उगाच उशीर नको म्हणून आम्ही साडेतीन वाजताच तेथे पोहोचलो. आमच्यासारखे 200 जण ऑडियन्स मध्ये बसण्यासाठी उत्सुक होते.

तिथे गेल्यावर आम्हाला समजले की पहिल्या शेड्युलला वेळ लागल्यामुळे दुसऱ्या शेड्युलच्या शूटिंगला वेळ होणार आहे .ती वेळ सहा वाजताची होती .मग दादासाहेब फाळके फिल्म सिटीमध्ये थोडा फेरफटका मारला व चहा वगैरे घेतला .तिथे काजोल, सैफ अली खानचा मुलगा आणि साऊथचा हिरो पृथ्वीराज व आपलाच जितेंद्र जोशी यांचे शूटिंग चालू होते ते बघण्यात दोन तास गेले. मग केबीसी वाल्यांना एकत्र हॉलमध्ये बसवले तेव्हा कळले की शूटिंग आठ वाजता सुरू होणार आहे. आम्ही ती संध्याकाळ केबीसीलाच वाहिली असल्यामुळे आमचा वेळ छान चालला होता.

MP Shrirang Barne : अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा – श्रीरंग बारणे

एकत्र बसल्यावर त्यांनी सगळ्यांना गाणी म्हणायला सांगितली . पण अटच होती की गाणी फक्त एबी सरांची म्हणायची . (केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना ए बी सर म्हणतात) माझ्या नणंदेनेही एक गाणे म्हटले . सर्वांचा उत्साह भरभरून ओसंडत होता. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी नाश्ता आणि कार्यक्रम संपल्यावर जेवण होते . खाण्याची चांगली चंगळ होती. चहा ,कॉफी मुबलक होते. यामध्ये दोन तास गेले. केबीसीच्या सेटवर बघायला आलेल्या प्रेक्षकांची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात होती .शेवटी आठ वाजता आम्हाला केबीसीच्या सेटवर नेऊन ड्रेस कोड प्रमाणे बसवण्यात आले.

तिथे आम्हाला एक सरप्राईज होते . ते म्हणजे तो स्पेशल एपिसोड होता आणि स्पेशल गेस्ट म्हणून क्रिकेट जगतातील दोन झगमगते तारे ,’स्मृती मंधाना ‘आणि ‘ईशान किशन’ हे दोघे आले होते.नऊ वाजता स्टेज डिरेक्टर संदीप कौल उर्फ सँडी यांनी प्रेक्षकांना काही सूचना दिल्या. स्वागत करताना टाळ्या कशा वाजवायच्या आपली उत्स्फूर्तता कशी दाखवायची इत्यादी. इथेही खूप गमती- जमती झाल्या. आम्ही खूप हसलो. आता प्रतीक्षा होती शहेनशाच्या आगमनाची बरोबर साडेनऊ वाजता ए बी सर मंचावर आले आणि काय सांगू त्यांना बघून अंगावर रोमांच उभे राहिले.

डोळे आपोआप पाणावले. प्रत्यक्ष देव पाहिला आणि तो आपल्याशी बोलला तर काय होईल याची अनुभूती मिळाली. शो ला सुरुवात झाली आमची सीट ए बी सरांच्या मागे होती. त्यांची पाठ आमच्याकडे होती म्हणून सुरुवातीला वाईट वाटले. पण नंतर कळले ती आमच्यासाठी एक पर्वणी होती .कारण प्रत्येक ब्रेक मध्येअमिताभ जी खुर्ची वळवून आमच्याशी गप्पा मारत होते .त्यामुळे आम्ही खुश झालो. दीड तास चाललेल्या शूटिंगमध्ये कुठेही रिटेक नाही, कंटाळा नाही ,फक्त हास्य ,विनोद ,प्रश्नोत्तरे आणि गप्पा आणि टाळ्यांचा कडकडाट .

स्मृती आणि ईशान ने देखील क्रिकेटमधील त्यांचे अनुभव सांगून कार्यक्रमाची रंगत वाढवली .जणू काही घरी बसून कार्यक्रम बघतोय असे शूट झाले. शूटिंग संपल्यावर अमिताभ बच्चनजी स्वतः प्रेक्षक गॅलरीपाशी गेले. (संदीप सरांनी सांगितले होते की फिल्म इंडस्ट्रीजला हा एकमेव नट आहे जो स्वतः लोकांमध्ये मिसळतो बाकी सारे जण पब्लिक पासून दूर पळत असतात.)प्रेक्षकांशी बोलले, त्यांच्याबरोबर फोटो काढले. आम्ही तयार केलेले पोस्टर त्यांना भेट म्हणून द्यायचे असल्याने मी ते घेऊनच बसले होते . अमिताभजींना ते दाखवले . त्यामुळे माझा एकटीचा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एक फोटो काढला गेला .अशी ही अविस्मरणीय आठवण मनात घेऊन रात्री एक वाजता आम्ही घरी आलो.

पण आत्ताही जर 83 वर्षाचे अमित जी पूर्ण दिवसाचे शूटिंग (सकाळी 11 ते रात्री 12) वाजेपर्यंत करू शकतात आणि पूर्ण वेळ त्याच उत्साहात असतात तर आपण थकून किंवा कंटाळून कसे चालेल या विचाराने कामाला (Pimpri ) जोश येतो .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.