Pune News: ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक करणाऱ्या भक्तांना मिळणार ‘वृक्ष गणेशा प्रसाद’

एमपीसी न्यूज – गणेशाप्रती असलेली श्रद्धा आणि समाजसेवा याची सांगड घालून निसर्गाची सेवा करण्याकरीता उद्युक्त करणारा वृक्ष गणेशा प्रसाद या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून गुढीपाडव्याच्या दिवशी होत आहे. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना अभिषेक करतील, त्या गणेशभक्तांना प्रसाद म्हणून देशी रोप आणि लाडू व पेढे स्वरुपातील उत्तम प्रतीचे गांडूळ खत देण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाचा शुभारंभ शनिवार, दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता मंदिरात होणार आहे, अशी माहिती दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे देण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, अभिनेते सयाजी शिंदे यांची सह्याद्री देवराई संस्था आणि कन्हैय्या दुबे व विजया घुले यांच्या समृद्धी सेंद्रीय गांडूळ खत प्रकल्प आणि उद्योग, सासवड यांच्या माध्यमातून हा उपक्रम होत आहे. मंदिरात गणरायाला अभिषेक करणा-या भक्तांना शमी, मंदार, जास्वंद, चाफा, बकुळ आदी देशी झाडांच्या रोपांचा प्रसाद देण्यात येईल.

 

या रोपांवर एक क्युआर कोड असून तो स्कॅन केल्यानंतर त्या रोपाची संपूर्ण माहिती देखील भक्तांना मिळणार आहे. निसर्गाचा समतोल राखला जावा, नागरिकांनी जास्तीत जास्त देशी वृक्षांचे रोपण करावे आणि कोविडसारख्या कोणत्याही संकटाला आपण चांगल्या वातावरणाद्वारे निसर्गाच्या मदतीने दूर ठेऊ, या उद्देशाने उपक्रम राबविला जात आहे.

भक्तांना सह्याद्री देवराई संस्थेकडून ही प्रसादरुपी रोपे मिळणार असून ती त्यांनी आपल्या घरी, सोसायटीत, शेतात लावावी, अशी संकल्पना आहे. वृक्षरुपी असा हा आयुष्यभर साथ देणारा बाप्पाचा प्रसाद असून समृद्धी सेंद्रीय गांडूळ खत प्रकल्प आणि उद्योग यांनी दिलेल्या पेढे व लाडू स्वरुपातील खताचा उपयोग करुन त्या वृक्षांची लागवड भक्तांना करता येणार आहे.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश हरित वारी अभियानांतर्गत यापूर्वी देखील ट्रस्टतर्फे सातत्याने निसर्गसंवर्धनाचे कार्य सुरु आहे. महाराष्ट्रातील पालखी सोहळयाच्या वारी मार्गावर वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब यांसारखे 50 लाख देशी वृक्ष लावून संपूर्ण वारी मार्ग व महाराष्ट्रातील प्रमुख महामार्ग हरीत करण्याचा महासंकल्प ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.

पंढरपूर, आळंदी, देहू यांसह राज्यातील 25 समविचारी संस्था या कार्यात ट्रस्टसोबत सक्रिय आहेत. तसेच देहूमध्ये देखील वृक्षारोपण करुन हरितवारीची संकल्पना पुढे नेण्याकरीता ट्रस्टने पुढाकार घेतला होता. आता वृक्ष गणेशा प्रसाद या उपक्रमातून ट्रस्टने पुढचे पाऊल टाकले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.