Pune News : पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस !

प्रत्यक्ष हजर राहण्याचेही नोटीसीत नमूद आहे.

एमपीसी न्यूज : मागील दहा वर्षातील संपत्तीचे विवरण द्यावे, अशी नोटीस आयकर विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ऐन दिवाळी सणाच्या दिवशी बजावली आहे. याची माहिती स्वत: चव्हाण यांनीच आज, बुधवारी पत्रकारांना दिली.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, सत्तेचा वापर कसा करायचा, तो कोणासाठी करायचा, याची भाजपने अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यूहरचना केली आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) नोटीस दिली होती. आता मला नोटीस आली आहे. मला काही दिवसांच्या मुदतीत खुलासा करावा लागणार आहे.

त्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचेही नोटीसीत नमूद आहे. 21 दिवसात त्याचा खुलासा करायचा असून त्याबाबत योग्य ती कार्यवाही आम्ही करत आहोत. तुमच्यासोबत आणखी कोणाला नोटीस आलेली आहे का, या प्रश्नावर चव्हाण यांनी मला त्याबाबत काहीही माहिती नाही, असे स्पष्ट केले.

मोदी सरकारवर राज्यातून तुम्हीच प्रखर टीका करत आहात. म्हणून तुमचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे, असे वाटते काय, या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, तसे काही नाही. ही नोटीस येतच असते. मात्र, सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपलाच जमते, हेच निश्चित आहे.

चव्हाण म्हणाले, चिराग पासवानच्या नेतृत्वाला भाजपनेच खतपाणी घालून मोठे केले. त्यामुळेच नितीशकुमार यांची कारकीर्द संपविण्याचा घाटच घातला गेला. बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे काम निराशाजनक झाले.

मात्र, नितीशकुमार यांना भाजपने संपविण्याचा कट निश्चित केला आहे. त्यामुळेच पासवान यांनी भाजपच्या नव्हे तर नितीशकुमार यांच्या उमेदवारांविरोधात आपले उमेदवार दिले आहेत. त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.