Pune News: कात्रज डेअरीकडून रुंदीकरणासाठी जागा देण्याची तयारी; सीमाभिंतींच्या खर्चास मान्यता

एमपीसी न्यूज – कात्रज डेअरीने रस्ता रुंदीकरणासाठी जागा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर महापालिकेने रस्ता रुंदीकरणामुळे पाडावी लागणारी सीमाभिंत बांधण्यासाठी 1 कोटी 6 लाख रुपये खर्च देण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

सातारा रस्त्याने कात्रज डेअरी येथून आंबेगाव पठार कडे जाणार्‍या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या अनेकवर्ष प्रलंबित कामाला गती मिळणार आहे. कात्रज डेअरीकडून आंबेगाव पठारकडे जाणार्‍या एकमेव रस्त्याची रुंदी कमी आहे. विशेष असे की, आंबेगाव पठार आणि तेथून पुढे आंबेगाव बुद्रुककडे जाणार्‍या वाहनांची या ठिकाणी मोठी वर्दळ असल्याने या रस्त्यावर सातत्याने गर्दी होते.

2017 ला मंजुर करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये हा रस्ता 24 मी. रुंद दर्शविण्यात आला आहे. या रुंदीकरणामध्ये पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरीचा सुमारे 4 हजार 410 चौ.मी. भाग बाधित होणार आहे.

रस्ता रुंदीकरणामध्ये कात्रज डेअरीच्या 314 चौ.मी.च्या तीन बैठ्या इमारतींसोबतच संपुर्ण सिमाभिंत पाडावी लागणार आहे. या भिंतीचा खर्च महापालिकेने उचलण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार भिंत बांधण्यासाठी येणारा 1 कोटी 6 लाख रुपये खर्च देण्यासंदर्भातील प्रस्ताव आज स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.