Pune News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कोविड ब्रिगेड- अ‍ॅड. वंदना चव्हाण

यामार्फत कोविड हॉस्पिटलची अद्यावत माहिती, टेस्टिंगच्या सोयी, अ‍ॅम्ब्युलन्स, समुपदेशन केंद्र, इतर वैद्यकीय सोयी आदींची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आग्रही पुढाकार घेतला आहे. पवारांच्या आदेशानुसार नागरिकांच्या सहाय्यासाठी व कोविड विषाणूचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोविड ब्रिगेड उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यसभेच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी दिली.

पक्षाच्यावतीने पुणे शहरात नागरिकांसाठी एनसीपी पुणे सिटी कोविड हेल्पडेस्क (NCP Pune City Covid HelpDesk) सुरू करणार आहे. यामार्फत कोविड हॉस्पिटलची अद्यावत माहिती, टेस्टिंगच्या सोयी, अ‍ॅम्ब्युलन्स, समुपदेशन केंद्र, इतर वैद्यकीय सोयी आदींची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या अंतर्गत कार्य करण्यासाठी विधानसभानिहाय राष्ट्रवादी ब्रिगेड तातडीने तयार करण्यात येणार आहे. या ब्रिगेडमध्ये आपल्याला काम करण्याची इच्छा असल्यास त्वरित विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहनही वंदना चव्हाण यांनी केले आहे.

सहभागी होणारे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी झूम अ‍ॅपद्वारे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बुधवारी (दि.9) करण्यात आले होते. पुणे विभागीय आयुक्त सौरभ सौरव राव, अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. केतकी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी विधानसभानिहाय 10 कार्यकर्ते अ‍ॅक्टिव्ह करणार आहे. प्रत्येक प्रभागात याची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये नगरसेवक सुद्धा सहभागी होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

प्लाझ्मा दान करणे, वेळेवर अ‍ॅम्ब्युलन्स देणे, 6 कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स नियोजन अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली, असे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला 50 लाख सुरक्षा कवच देऊ, असे आश्वासन सौरभ राव यांनी दिले. कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देणे, वाढीव बिल कमी करणे यावरही चर्चा करण्यात आली.

जवळपास 250 कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमदार चेतन तुपे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे, युवक अध्यक्ष हंडे, प्रदेश सरचिटणीस राकेश कामठे, मनाली भिलारे, संतोष नांगरे, नगरसेविका अश्विनी कदम, प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक योगेश ससाणे, माजी महापौर दत्ता धनकवडे, नगरसेवक विशाल तांबे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, विधानसभा अध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.