Pune News : तीन सदस्यीय प्रभाग रचनेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका

एमपीसी न्यूज – महानगरपालिका निवडणुकांसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकित घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाला पुण्यातील परिवर्तन संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परिवर्तन संस्थेचे संस्थापक विश्वस्त तन्मय कानेटकर यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या मार्फत हि याचिका दाखल करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी कायदा बदलून त्यांना महापलिकेत सत्तेत यायला सोयीची व्यवस्था आणली आहे. अगदी उघडपणे सत्तेसाठी निवडणूक व्यवस्थेचा खेळखंडोबा केला गेला आहे. कधी दोन, कधी चार सदस्यांचा प्रभाग हा लोकशाहीचा राजकारणासाठी वापर कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

‘राज्य सरकारने केलेला तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा ठराव अमान्य करण्याचा अधिकार कायद्यानुसार राज्य निवडणूक आयोगाला आहे. कारण महाराष्ट्र म्युनिसिपल (सुधारणा) कायदा 1994 मधील कलम 5 (3) मध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार नुसार ‘राज्य सरकार’ ऐवजी ‘राज्य निवडणूक आयुक्त’ यांना महानगर पालिका निवडणूकीसाठी वॉर्ड ठरविणे, वॉर्डच्या सीमा निश्चित करणे तसेच प्रत्येक वॉर्डातील उमेदवारांची संख्या ठरविणे हे अधिकार मिळतात. हा अन्वयार्थ न्यायालयाने मान्य केल्यास सगळे चित्र बदलू शकते,’ असे याचिकाकर्त अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

एक प्रभाग – एक नगरसेवक अशीच मागणी सगळ्या महापालिकांमधील मतदारांनी केली पाहिजे. प्रभाग रचनेला वेळोवेळी आपल्या सोयीनुसार बदलणाऱ्या राजकारणाचा याचिकेतून निषेध करण्यात आला आहे. पुण्यासह अन्य सर्व होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांवर परिणाम करणारी ही याचिका ठरू शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.