Pune News : कोरोना संकटात पुणेकरांची पालिकेला साथ, चार महिन्यांत अडीच हजार कोटींचा महसूल

एमपीसी न्यूज – कोरोना संकटातही महापालिकेच्या तिजोरीत 2 हजार 523 कोटीचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती खालावलेल्या महापालिकेला पुणेकरांनी साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8 हजार 370 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात गेल्या चार ते पाच वर्षांत पालिकेस केवळ 4 हजार ते 4 हजार 500 च्या आसपासच उत्पन्नाचे उद्दीष्ट गाठता आले आहे. परिणाम, प्रत्येक वर्षाचा जमा-खर्चाचा अंदाज चुकत असून महापालिकेची अंदाजपत्रकीय तूट 3 हजार कोटींच्या घरात गेली आहे. महापालिकेकडून महापालिकेच्या खर्चासह, अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेली जमा बाजू तसेच पालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठीप्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून महसूल वाढ समिती नेमण्यात आली आहे.

या समितीची नुकतीच आढावा बैठक झाली. महापालिकेने आर्थिक वर्षाच्या केलेल्या नियोजनानुसार, सर्व निर्णय तसेच उत्पन्नवाढीचे काम सुरू झाल्यास महापालिकेस 8 ते 9 हजार कोटींचा महसूल मिळेल असे सांगितले.

दरम्यान, यावेळी प्रशासनाने मागील चार महिन्यात सुमारे 2523 कोटींचा महसूल जमा झाल्याची माहिती दिली. तसेच 1 एप्रिल ते 31 जुलै अखेरपर्यंत प्रशासनास एलबीटी अनुदानाचे 904 कोटी, मिळकतकराचे 971 कोटी तर बांधकाम शुल्कापोटी 491 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर उर्वरीत 157 कोटींचा महसूल इतर विभागातून मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.