Pune News: ‘पुणे – लोणावळा रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरण कामाला गती द्या’ – गोविंद घोळवे

एमपीसी न्यूज – पुणे – लोणावळा चौपदरी रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी, आकुर्डी रेल्वे जंक्शन येथे देशभरातील रेल्वे गाड्यांच्या तिकीट आरक्षणासाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू करावी, अशा मागण्या शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केल्या आहेत. त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले.

शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी नवी दिल्ली येथे रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले. या भेटीविषयी गोविंद घोळवे म्हणाले, पुणे – लोणावळा दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना किमान सोयी उपलब्ध व्हाव्यात, प्रलंबित पुणे – लोणावळा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे, लोकलमध्ये वाढ करावी या मागण्या करण्यात आल्या. चिंचवड येथे नवीन एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा नाही. त्यामुळे पिंपरी – चिंचवडकरांची गैरसोय होत असल्याकडे रावसाहेब दानवे यांचे लक्ष वेधण्यात आले.

दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी रेल्वे स्थानकांची सद्यःस्थिती आणि पुढील 50 वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध कराव्यात.पुणे – लोणावळा दरम्यानच्या विविध रेल्वे स्थानकांवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रात्री पोलिस बंदोबस्त तैनात करावा. सर्व रेल्वे स्थानकांवर महिला आणि पुरुषांसाठीची स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची कार्यवाही करावी. कमी आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट आरक्षणासाठी तीन खिडक्या सध्या सुरू आहेत. पिंपरी आणि आकुर्डी येथेही तिकीट आरक्षण खिडकी सुरू व्हावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

पुणे – लोणावळा चौपदरी रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली आहे. पुणे – लोणावळा लोकलसाठी स्वतंत्र मार्ग तयार झाल्यानंतर नवीन लोकल गाड्यांत वाढ करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिल्याचे गोविंद घोळवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.