Pune News : टास्क फोर्सची मागणी म्हणजे खासदार बापट यांची अपयशाची कबुली- विरेंद्र किराड

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने टास्क फोर्स पाठवावा, अशी खासदार गिरीश बापट यांची मागणी म्हणजे भाजपच्या अपयशाची कबुली आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष विरेंद्र किराड यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

गेले सात महिने कोरोनाची साथ शहरात थैमान घालत आहे. या कालावधीत भाजपच्या नेत्यांनी साथ नियंत्रणासाठी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. खासदार गिरीश बापट यांनी साथ आटोक्याबाहेर गेल्यावर केंद्र सरकारकडे लोकसभेत मागणी केली.

याऐवजी त्यांनी सुररुवातीपासूनच लक्ष घालून केंद्र सरकारकडून पुण्यासाठी मदत मिळवायला हवी होती. ते न करता पक्षाच्या वरिष्ठांना खूष करण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी ते आता खटाटोप करीत आहेत, असे किराड यांनी पत्रकात म्हटले आहे.

भाजपात समन्वयाचा अभाव

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही पाच महिने उलटून गेल्यावर पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीनंतरही बापट टास्क फोर्सची मागणी करत आहेत. याचा अर्थ भाजपमध्ये समन्वय नाही.

भाजपचे सहा आमदार पुण्यात आहेत. एखादा अपवाद वगळता बाकी निष्क्रीय आहेत. मदतकार्यातही त्यांचा सहभाग दिसत नाही. शहराचे आरोग्य राखणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. तिथे भाजपची सत्ता असूनही शहराचे आरोग्य उत्तम राखण्यात भाजपला अपयश आले आहे, असे किराड यांनी पत्रकात म्हटले आहे.

पुण्यासाठी 20 आयएएस अधिकारी नेमले असे बापट यांनी लोकसभेत सांगितले. ते 20 अधिकारी कोण हे बापट यांनी जाहीर करावे, अशी मागणी विरेंद्र किराड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.