Pune News: झोपेत असतानाच काचेने चिरला गळा; नऱ्हेच्या व्यसनमुक्ती केंद्रात हत्येचा थरार

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील नऱ्हे परिसरात असणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रात एका व्यक्तीचा झोपेत असताना गळा चिरून खून करण्यात आला.

अरुण मोहन राठी (वय 65) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संकेत सुनील आल्हाट (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऱ्हे येथील एका निवासी इमारतीत हे व्यसनमुक्ती केंद्र आहे. त्या ठिकाणी 45 व्यक्ती उपचार घेत आहेत. प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी वेगवेगळे फ्लॅट आहेत. एका फ्लॅटमध्ये 12 जण राहत होते. मयत अरुण राठी हे मध्यरात्री गाढ झोपेत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास संकेत आल्हाट जागा झाला. त्याने राठी यांच्या तोंडावर टॉवेल ठेवला आणि त्यानंतर काचेनी त्यांचा गळा चिरला.

 

दरम्यान हे सर्व कृत्य होत असताना राठी जिवाच्या आकांताने ओरडत होते. त्यामुळे फ्लॅटमधील इतर सहकारी जागे झाले. मात्र आल्हाट यांचा आक्रमकपणा पाहून आणि राठी यांच्या शरीरातील वाहणारे रक्त पाहून सर्व जागीच स्तब्ध झाले. राठी यांनी तडफडून प्राण सोडल्यानंतर संकेत आल्हाट शांत झाला आणि आपल्या जागेवर गेला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.