Pune News: त्या वकिलासोबत झालं तरी काय ? एक तारखेपासून आहेत बेपत्ता

एमपीसी न्यूज – पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट उमेश मोरे हे 1 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारा दिवस झाले तरी अद्याप त्यांचा तपास लागला नसल्यामुळे त्यांच्यासोबत नेमकं झालं तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता उमेश मोरे हे बेपत्ता झाल्याचा दिवशी त्यांच्या आसपास संशयास्पद रित्या दोन व्यक्ती दिसत आहे. पोलीस या दोघांचाही शोध घेत आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी एक स्वतंत्र पथकही तयार केले असून सध्या तांत्रिक बाजूने तपास केला जात आहे.

उमेश मोरे मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करतात. दोन वर्षांपूर्वी एका मोठ्या लाच प्रकरणाच्या गुन्ह्यातील ते फिर्यादी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुमिअभिलेख अभियंता बाळासाहेब वानखेडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती.

1 ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे न्यायालयात गेले होते. न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी काही मित्रांनाही ते भेटले. त्यानंतर पत्नीशी फोनवर बोलल्यानंतर घरी येतो असे त्यांनी सांगितले. परंतु रात्री नऊ वाजल्यानंतर ही ते परत आले नाहीत.त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.