Pune : कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बांधकामास परवानगी : रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. या बांधकामांना लॉकडाऊनपूर्वी परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे काही अटी घालण्यात आल्या आहेत.

यापूर्वी महापालिका आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशी 12 तासांची वेळ ठरवून देण्यात आली आहे. कोणती दुकाने कोणत्या दिवशी उघडायचे याचे वेळापत्रकही ठरवून देण्यात आले आहे.

बांधकाम करतेवेळी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कामगारांना कामाच्या ठिकाणी शिबिरात राहावे लागेल. प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग केले जावे. कोणाला जास्त ताप असेल तर प्रवेश दिला जाऊ नये. सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांचे डायबेटीस, ब्लड टेस्ट करण्यात याव्यात.

कामगारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, कामाच्या ठिकाणी कामगारांची जेवणाची, हात धुण्याची व्यवस्था करावी, कर्मचारी आणि कामगारांनी मास्कचा वापर करावा, जंतुनाशक फवारणी करावी, डॉक्टरांकडून आरोग्य तपास करून घ्यावी, कोणीही कोणाशी हस्तांदोलन करू नये, अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर आजारी कामगारांसाठी स्वतंत्र विलगिकरण कक्ष करावा, साईटच्या ठिकाणी बॅरिकेट लावण्यात यावे, महाराष्ट्र शासन आणि पुणे महापालिकेच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करावे, या सर्व सूचनांचे पालन करून बांधकामे करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी कोरोना नाही. तेथे आता बांधकामे सुरू करण्याचा आदेश दिल्याने काही प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. मागील दीड महिन्यापेक्षा जास्त लॉकडाऊन असल्याने मजुरांच्या घरातील होते नव्हते ते संपले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.