Pune : अभिनेता संतोष जुवेकर याच्यावर दहीहंडी दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

संतोष जुवेकर म्हणतो मी पुण्यात नव्हतोच !

एमपीसी न्यूज- दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान विनापरवाना स्टेज उभारून ध्वनिप्रदूषण केल्याच्या आरोपावरून मराठी अभिनेता संतोष जुवेकर सहित चार जणांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ‘मी दहीहंडीच्या दिवशी पुण्यात नव्हतोच’ असे वक्तव्य संतोष जुवेकर याने एमपीसी न्यूजशी बोलताना केल्यामुळे नेमका काय प्रकार आहे अजून स्पष्ट झाले नाही.

अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचा अध्यक्ष सिद्धांत मदन प्रधान (रा. नूतन महाराष्ट्र सोसायटी, पद्मावती)स्टेज मालक राजवानसिंग बलीसिंग राठोड (रा. गणेशपार्क, वाघजाईनगर कात्रज ), साउंड सिस्टीमचे मालक विजय बापूसाहेब वरूटे (रा उचगाव जि. कोल्हापूर )अशी अन्य आरोपींची नावे आहेत.

सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ३) अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळातर्फे तावरे बेकरी चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विनापरवाना अधिक लांबी रुंदीच्या स्टेजची उभारणी करून या ठिकाणी सिने अभिनेते संतोष जुवेकर यांच्या उपस्थितीमध्ये मोठमोठ्या आवाजात ध्वनिप्रदूषण करून कार्यक्रम सुरु होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी सुमारे 200 ते 300 लोक या चौकात जमले असल्याने येथील वाहतुकीस अडथळा केल्या प्रकरणी तसेच कार्यक्रम बंद करण्यास नकार दिल्या प्रकरणी चारही आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘मी दहीहंडीच्या दिवशी पुण्यात नव्हतोच. मी दिवसभर घराच्या बाहेरच पडलो नाही’ असे अभिनेता संतोष जुवेकर यांनी एमपीसी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यामुळे नेमका काय प्रकार घडला आहे हे स्पष्ट झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.