Pune :महापारेषणच्या यवत उप केंद्रामधील कामामुळे उरुळीकांचन सह 4 गावांमध्ये भारनियमनाची शक्यता

एमपीसी न्यूज – महापारेषण कंपनीच्या यवत अतिउच्च दाब उपकेंद्रातील(Pune) 25 एमव्हीए च्या जागी 50 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. येत्या गुरुवार (दि.2) ते शुक्रवार (दि. 13) पर्यंत हे काम सुरु राहणार आहे. या कालावधीत महावितरणच्या मुळशी विभाग अंतर्गत उरुळी कांचन शहर व 4 गावांना पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र ऐनवेळी भार व्यवस्थापन शक्य न झाल्यास चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या यवत अतिउच्च दाब उपकेंद्रात (Pune)सध्या 25 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. विजेची वाढती मागणी तसेच सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी या उपकेंद्रात 25 एमव्हीए ऐवजी 50 एमव्हीए चा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. अतिशय प्रचंड पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी दि. 2 ते 13 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी लागणार आहे.

Pune : दिवाळीनिमित्त पुण्यातून सुटणार जादा 512 बसेस

महापारेषणच्या यवत अतिउच्चदाब उपकेंद्रातून महावितरणच्या कोरेगाव (मूळ) 33/11 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा होतो व या उपकेंद्रातून चार वीजवाहिन्यांद्वारे उरूळी कांचन शहर, अष्टापुर, हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी या गावातील 15 हजार 700 ग्राहकांसह पेठ, मिरवडी, शिंदेवाडी व हिंगणगाव येथील 1200 कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र महापारेषणच्या उपकेंद्रातील क्षमतावाढीच्या कामामुळे सुमारे तीन मेगावॅट विजेची तूट निर्माण होणार आहे.

महावितरणकडून ही तूट भरून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठ्याचे तांत्रिक नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उरुळी कांचन शहरासह सर्वच भागात वीजपुरवठा सुरु राहणार आहे.

ऐनवेळी विजेची मागणी वाढल्यास व काही तांत्रिक कारणामुळे विजेचे भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर उरूळी कांचन शहर, अष्टापूर, हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकर वाडी या गावांसह 1200 कृषिपंपांच्या वीजपुरवठ्यात तीन तासांपर्यंत चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत सर्व वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.