Pune : पुण्यात ‘रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स’चे जवान दाखल ; कोंढवा परिसरात काढला रुट मार्च

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सोमवारी ( दि.18) शीघ्र कृती दलाचे जवान ( रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स ) पाचारण करण्यात आले आहेत. पुण्यातील कोंढवा परिसरात आरएएफ (RAF) च्या जवानांनी रुट मार्च काढला होता.

पुणे पोलिसांसोबत आरएएफ (RAF) चे जवानही शहरात महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्ताचं काम पाहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात सोमवारी एकाच दिवशी करोनाचे 102 रुग्ण आढळले होते तर पिंपरी चिंचवड मध्ये 22 रुग्ण आढळले.

आतापर्यंत पुण्यात करोना बाधित रुग्णांची संख्या 3 हजाराच्या पुढे गेली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या 226 वर पोहोचली आहे. अशी भयानक परिस्थिती असतानाही नागरिक विना कारण बाहेर फिरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या नागरिकांना चाप बसावा म्हणून यापुढे पुणे पोलिसांसोबत आरएएफच्या जवानांचीही अशा लोकांवर नजर असणार आहे.

मुंबईसह पुण्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत बेजबाबदार पणे बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांबरोबर आता RAF यांच्या वर सुद्धा मोठी जबाबदारी असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.