Pune : बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आणि श्रद्धा – चंद्रकांत पाटील

संजय राऊत त्यावेळी कुठेच नव्हते!

एमपीसी न्यूज : भाजपचे नेते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune) यांनी बाबरी मशिद पाडण्यात शिवसैनिक नव्हते अशा प्रकाराचे विधान केले. हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गट विरुद्ध चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेत राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करावी लागली.

त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी एका मुलाखतीमध्ये अनेक मुद्यावर सविस्तर भूमिका मांडली आहे. माझे लहानपण मुंबईत गेले असून मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जवळून पाहता आले. त्यांच्या मुळेच हिंदुत्ववादी विषयांना चालना मिळाली असून बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मुंबईतील हिंदू जिवंत राहिला आहे.

त्यामुळे माझ्या मनात स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्याबद्दल कायम आदर आणि श्रद्धा आहे. माझ्याकडून त्यांचा कधीच अनादर होणार नसल्याची ग्वाही देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली.

तसेच ते पुढे म्हणाले की, बाबरी मशिद ही विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली पाडण्यात आली. त्यावेळी स्वर्गीय आनंद दिघे यांनी तर सोन्याची वीट दिली होती. बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडल्याची जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी स्वीकारली होती.

पण, बाबरीचा ढाचा पाडताना तिथे प्रत्यक्ष शिवसैनिक (Pune) होते का? तर तिथे शिवसैनिक किंवा नॉन शिवसैनिक असं कुणी नव्हतं. ती मशीद प्रामुख्याने हिंदूंनी पाडली. विश्व हिंदू परिषदेचं नेतृत्व होतं,  हा माझा बोलण्याचा मुद्दा होता.

यामध्ये मी चुकूनही बाळासाहेब ठाकरेंचा अनादर करण्याचा मुद्दा नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आणि श्रद्धा असल्याचे सांगत आज जे संजय राऊत विधान करीत आहेत, त्यावेळी ते कुठेच नव्हते. अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.

Bhosari : जाब विचारला म्हणून महिलेवर चाकूने वार

उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलणार – चंद्रकांत पाटील

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुमच्या विधाना बाबत राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अनादर करण्याचा मुद्दा येत नाही. मी नेहमीच ‘मातोश्री’च्या संपर्कात राहिलो आहे. माझे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संबध चांगले आहेत. पत्रकार परिषद होताच उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.