Pune : श्री रामदास स्वामींच्या पादुकांचे भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत

एमपीसी न्यूज- सज्जनगड येथून गुरुवारी (दि. 9) संध्याकाळी निघालेल्या श्री रामदास स्वामींच्या पादुकांचे पुण्यात मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ गोगावले मठात अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

यावेळी गोगावले परिवार व मठातील सेवेकरी यांनी पादुकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. मठासमोर सुंदर रांगोळी, विविध रंगाच्या फुलांचे सजलेले दारावर तोरण, पताका यामुळे उत्साहाचे वातावरण पसरले होते. भक्तांना स्वामींच्या पादुकांचे रांगेतून दर्शन घेताना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी उत्तम नियोजन केले होते.

श्री रामदास स्वामींच्या पादुकांचे आगमन होताच अपर्णा प्रताप गोगावले यांनी पादुकांवर फुले वाहून, निरांजन लावून रामनामाच्या जयघोषात सेवेकऱ्यांच्या सोबत श्री स्वामी मठात स्वागत केले. मठातील श्री स्वामी समर्थ पादुकांसमोर श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुका ठेवून सज्जनगडाहून आलेल्या रामदास स्वामींच्या सेवकांच्या मार्गदर्शनाखाली पादुकांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर प्रताप अनंत गोगावले आणि परिवार यांच्या हस्ते विधीवत पूजा व आरती करण्यात आली.

स्वामींच्या पादुकांचे केलेले जतन व नूतनीकरण याबाबतची माहिती रामदास स्वामींच्या सेवकांनी दिली. प्रताप गोगावले यांनी सज्जनगडावरील जुन्या आठवणींना उजाळा देत गोगावले परिवारातील एका सदस्याने रामदास स्वामीच्या सेवेत आपले जीवन अर्पण केले याचाही उल्लेख केला. कार्यक्रमाच्या शेवटी रामदास स्वामीची आरती व मठातील नित्य आरती म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.