Pune : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहाता पालकमंत्र्यांनी पुण्यात लक्ष घालावे – आम आदमी पार्टी

एमपीसी न्यूज : तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा उडालेला फज्जा लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची भीती आहे. ती पाहाता पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लक्ष घालावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते डॉ.अभिजित मोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

गेल्या काही दिवसांमधील पुण्यातील अनागोंदी पाहाता पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांचे या शहराकडे दुर्लक्ष झाले आहे असेवाटण्याजोगी परिस्थिती झाली आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीही आहेत. त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. परंतु, पुणे हा कोरोनाच्या साथीतील महत्त्वाचा हॉटस्पॉट असल्याने पालकमंत्री या नात्याने त्यांनी पुण्यात ठाण मांडून आधिक लक्ष घालणे गरजेचे असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

त्याचबरोबर स्थलांतरित कामगारांसाठी, पुण्यातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या लोकांसाठी लागणारे मेडिकल सर्टिफिकेट कोणी द्यावयाचे? कशा स्वरूपात द्यावयाचे? खासगी डॉक्टर्स सर्टिफिकेट देताना भरमसाठ पैसे उकळत आहेत याबाबत प्रशासनाची भूमिका काय? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

गोंधळाच्या वातावरणातच ही प्रक्रिया पुढे जात आहे. पुणे महापालिकेची अनेक रुग्णालये सर्टिफिकेट देण्यास नकार देत आहेत. अनेक कामगारांना ससून रुग्णालयात जाण्यास सांगण्यात येत आहे. याबाबत महापालिकेवर तातडीने कारवाई व्हायला हवी, अशी आम आदमी पार्टीची मागणी असल्याचे मोरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.