Pune : कोरोना हॉटस्पॉट वॉर्डात रुग्णवाढीचा दर कायम; भवानी पेठेत तब्बल 433 रुग्ण

एमपीसी न्यूज – कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या 5 वॉर्डात सातत्याने रुग्ण वाढतच आहेत. या वॉर्डात आणखी वेगाने चाचण्या करण्यात येणार आहेत. रोज तब्बल 1500 चाचण्या करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रत्येक नागरिकाची तपासणी करून मास्क देण्यात येणार आहे.

सध्या भवानी पेठ 433, ढोले पाटील 322, शिवाजीनगर 243, येरवडा 217, कसबा 172, धनकवडी 124, वानवडी 104, बिबवेवाडी 76, हडपसर58, नगररोड 57, कोंढवा 33, सिंहगडरोड 16, वारजे-कर्वेनगर 11, कोथरूड 5, औंध-बाणेर 4, पुण्या बाहेरील 70 असे एकूण पुणे शहरात 1949 कोरोनाचे रुग्ण आहेत.

कोरोनाचे हे हॉटस्पॉट कमी करण्याची जबाबदारी साखर आयुक्त सौरभ राव, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिनदर प्रतापसिंग, भूजल सर्वेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकार यांच्याकडे आहे. हे वरीष्ठ अधिकारी रोज या भागात कोरोना रुग्णांचा व एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जलद नियंत्रणाच्या दृष्टीने शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. येरवडा- कळस – धानोरी, कै. ढोले पाटील रस्ता, शिवाजीनगर घोले रस्ता, भवानी पेठ, कसबा विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मनपा शाळेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तपासणी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.