Pune : ‘तुम्ही-आम्ही पालक’च्या 100 व्या अंकाचे प्रकाशन संपन्न

एमपीसी न्यूज – “ज्यावेळी गावातील युवकांना (Pune) नोकरीसाठी शहरात यायची गरज भासणार नाही; ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश समृद्ध होईल. त्यामुळे ग्रामविकासाची चळवळ गावखेड्यात खोलवर रुजवायला हवी,” असे मत बीव्हीजी उद्योग समूहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले. पालक म्हणून मुलांवर चांगले संस्कार करण्याची, त्यांना ग्रामसंस्कृतीची ओळख देण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सुजाण पालकत्व घडविण्याचे ध्येय घेऊन वाटचाल करत असलेल्या ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या शंभराव्या अंकाच्या प्रकाशनावेळी गायकवाड बोलत होते. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात ‘तुम्ही-आम्ही पालक’साठी मोलाचे योगदान दिलेल्या लेखकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे होते. प्रसंगी लेखक डॉ. श्रीराम गीत, ‘तुम्ही-आम्ही पालक’चे संस्थापक संपादक व साद माणुसकीची फाऊंडेशनचे अध्यक्ष हरीश बुटले, डॉ. रोहिणी बुटले आदी उपस्थित होते. यावेळी डीपर व महाएक्झाम परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा, शिक्षकांचा तसेच साद माणुसकीची फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

हणमंतराव गायकवाड म्हणाले, “महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ असा नारा दिला होता. याचा अर्थ जेव्हा देशातील खेडी समृद्ध होतील, तेव्हाच देश खऱ्या अर्थाने महासत्ता होईल, हा विचार त्यामागे होता. हाच विचारांचा वारसा सक्षमपणे पेलत साद माणुसकीची फाऊंडेशनच्या माध्यमातून हरीश बुटले यांचे कार्य सामाजिक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील विकास घडविण्यासाठी स्वतःपासून पुढाकार घेणे महत्वाचे असते. त्यांचे सुरु असलेले सामाजिक दायित्व भावनेतील कार्य प्रेरणादायी आहे.”

डॉ. शरद कुंटे म्हणाले, “शैक्षणिक काम हे पंढरीच्या वारीप्रमाणे (Pune) असते. विद्यार्थी हाच आपला परमेश्वर असतो. दरवर्षी तो वेगवेगळ्या रुपात येतो. त्या विद्यार्थीरुपी परमेश्वराची शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक सेवा करणे महत्त्वाचे आहे. समाजातील प्रत्येक जण कोणत्या तरी स्वरूपात पालक असतो. आज सामाजिक, शैक्षणिक पालकत्व घेण्याची गरज आहे. ‘तुम्ही-आम्ही पालक’च्या माध्यमातून पालक सुदृढ, सुजाण व सुसंस्कृत होण्यासाठी बुटले करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.”

Shirgaon : दारुंब्रे येथून दीड लाखांचे ऑफिस केबीन चोरीला

हरीश बुटले म्हणाले, “सलग १०० अंक प्रकाशित करणे जिकिरीचे होते; पण मनातील आत्मविश्वास आणि सामाजिक आत्मीयता या भावनेतून सर्वांच्या सहकार्याने शब्दक्रांतीचा हा ठेवा निर्माण करू शकलो याचा विशेष आनंद आहे. समाजातील वाचन संस्कृती टिकली पाहिजे, हा विचार घेऊन काम केल्याने यशाचा टप्पा गाठता आला. मनाची प्रगल्भता वाढवण्यासाठी ‘तुम्ही-आम्ही पालक’ हा अंक उपयुक्त आहे.”

सूत्रसंचालन माया प्रभुणे यांनी केले. आभार संदीप बर्वे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.