Pune: महाकवी कालिदास यांच्या काव्यावर आधारित ‘ऋतुसंहार’ या विशेष कार्यक्रमाने रंगला नादमुद्रा महोत्सव

एमपीसी न्यूज –  किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याची गायकी सोबतच(Pune) महाकवी कालिदास यांच्या काव्यावर आधारित ‘ऋतुसंहार’ या विशेष कार्यक्रमाने नादमुद्रा या सांगीतिक महोत्सवाचा पहिला दिवस आज संपन्न झाला.
 कर्वेनगर येथील डी पी रस्त्यावरील केशवबाग येथे सदर तीन दिवसीय(Pune) सांगीतिक महोत्सव सुरु असून अल्फा इव्हेंटसच्या वतीने आणि बेलवलकर हाउसिंगच्या विशेष सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजक निखिल जोशी, सुप्रसिद्ध गायिका अपर्णा पणशीकर, विदुषी मीरा पणशीकर, नील बेलवलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पं विनायक तोरवी आणि पं व्यंकटेश कुमार यांचे शिष्य असलेले धनंजय हेगडे यांच्या गायनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली. त्यांनी यावेळी राग पुरिया कल्याण सादर केला.
यामध्ये त्यांनी ‘आज सोबन… ‘ ही विलंबित तीन तालातील आणि ‘बहुत दीन बिते … ‘ ही द्रुत तीनतालातील पारंपरिक बंदिश प्रस्तुत केली. यानंतर त्यांनी आपले गुरू पं विनायक तोरवी यांचा द्रुत एकतालातील तराणा सादर केला. किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याची गायकी यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी अनुभविली.
महाशिवरात्रीचे औचित्य साधत हेगडे यांनी राग शंकरा मध्ये आपल्या गुरुंची ‘ शंभो शंकर…’ ही द्रुत एकतालातील रचना सादर करीत समारोप केला. धनंजय हेगडे यांना संजय देशपांडे (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), शुभांगी आणि आशुतोष यांनी तानपुरा साथ केली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात महाकवी कालिदास यांच्या ‘ऋतुसंहार’ यावर विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये पं भास्करबुवा जोशी व विदुषी मीरा पणशीकर यांची शिष्या अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य पं रघुनंदन पणशीकर आणि पं रोहिणी भाटे यांची शिष्या व सुप्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस व सहकारी यांचा सहभाग होता.
‘ऋतुसंहार’ या कार्यक्रमाची संकल्पना अपर्णा पणशीकर यांची असून महाकवी कालिदासांचे विविध ऋतूतील काव्य असलेल्या ऋतुसंहारचे बंदिशरूपाने सादरीकरण यामध्ये केले गेले आहे. या बंदिशी स्वतः अपर्णा पणशीकर आणि विदुषी मीरा पणशीकर यांनी संगीतबद्ध केल्या असून अपर्णा पणशीकर आणि पं रघुनंदन पणशीकर यांनी त्या गायल्या तर शर्वरी जमेनीस आणि सहकारी यांनी यावर कथक नृत्य प्रस्तुती केली.
ऋतुसंहारमध्ये महाकवी कालिदास यांनी ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, बसंत या सहा ऋतूंचे वर्णन  केले असून अपर्णा पणशीकर आणि पं रघुनंदन पणशीकर या भाऊ बहिणीने यानिमित्त यातील श्लोकांचे बंदिशीमध्ये एकत्रित सादरीकरण केले.

Pimpri : आर्थिकदृष्टया समृध्द होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्या – शंकर जगताप

यावेळी  वर्षा ऋतूतील ‘आनंद पुलकित पुलकित चाल सुहानी’ ही कविता, ‘सहेलिया साजन घर आया… ‘ ही शिशिर ऋतूतील बंदिश, ‘सजनी छाई घटा घन घोर…’ ही पारंपरिक कजरी या काही रचना त्यांनी सादर केल्या. ‘झुलत राधा संग गिरीधर…’ हे वसंत ऋतू मधली राग सोहनी मधील भजन सादर करीत त्यांनी समारोप केला.  या प्रयोगाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.  पंडित रघुनंदन पणशीकर यांनी राग वसंत बहार आणि राग केदार मधील बंदिशी प्रस्तुत केल्या. यावेळी संजय करंदीकर (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी),  अंजली शिंगडे- राव (व्हायोलिन), सुनील अवचट (बासरी), पद्माकर गुजर (पखावज), रोहित कुलकर्णी (की बोर्ड), आणि नीरजा आपटे यांनी निवेदन केले. नीरजा आपटे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचेही सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.