Pune : पुणे जिल्ह्यात उद्योजकांना कुठलीच सूट नाही : विभागीय आयुक्त

एमपीसी न्यूज – कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतीच काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता  दिली आहे. परंतु पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शिथिलता पुणे महानगर क्षेत्रामध्ये (पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण तसेच एमआयडीसी) रद्द करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात कोणतीच सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे यापुढे 17 एप्रिल पूर्वीचीच परिस्थिती कायम राहील, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, “पुणे जिल्ह्यात मेडीसीन, एलपीजी अशा सारख्याच अत्यावश्यक सेवांना (ज्यांना 17 एप्रिल) पूर्वी परवानगी देण्यात आली आहे. त्याच सेवा आता चालू राहतील. परंतु, या उद्योगांच्या व्यवस्थापनाने त्यांच्या कामगारांना लॉकडाऊनच्या कालवधीमध्ये त्या उद्योगाच्या ठिकाणीच निवासाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना इतर ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.”

 डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले,  “कोरोनाच्या प्रार्दुभावापासून आपल्या व कुटुंबाच्या संरक्षणाकरीता प्रशासन, पोलीस विभाग, महसूल विभाग व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. तसेच अनेक सामाजिक संस्थाही याकरीता समाजपयोगी काम करीत आहेत. पुणे महानगर क्षेत्रामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आपल्या व कुटुंबीयांच्या हिताकरिता आपण घराबाहेर पडू नका. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याला मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार, हृदयरोग यांसारखे आजार असल्यास तसेच त्यांना किंवा इतर सदस्यांना फ्लू सदृश आजाराची लक्षणे दिसल्यास त्याची ताबडतोब वैद्यकीय तपासणी करावी.

आवश्यकता वाटेल तेव्हां तात्काळ वैद्यकीय अधिका-यांशी किंवा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेला संपर्क करावा.  तसेच नियमीतपणे मास्कचा वापर करावा. बाहेरुन आल्यास एकदम कुटुंबांतील सदस्यांशी थेट संपर्क टाळावा, कोणत्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नये. आपण प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रशासनास सहकार्य केल्यास आपण निश्चितच या संकटावर मात करु शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.