Pune : आषाढी एकादशीपर्यंत विठ्ठल मंदिर बंद ; पंढरपूरला दर्शनाला जाण्यासाठी राज्यातील कुठल्याही भागातून ऑनलाईन पास मिळणार नाही

Vitthal temple closed till Ashadi Ekadashi; There will be no online pass from any part of the state to visit Pandharpur

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर आषाढी एकादशीपर्यंत (1 जुलै) बंद राहणार आहे. तसेच राज्याच्या कोणत्याही भागातून पंढरपूरला दर्शनाला जाण्यासाठी ऑनलाईन पास देखील मिळणार नाही, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. आळंदी आणि देहू येथून संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देखील प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या नुसारच सुरु झाला आहे.

अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांनी पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले.

_MPC_DIR_MPU_II

राज्याच्या कोणत्याही भागातून यावर्षी दिंड्या पंढरपूर, देहू, आळंदीकडे येणार नाहीत. पालखी सोहळ्याला यावर्षी परवानगी देण्यात आलेली नसून केवळ ही प्रथा सुरु राहणार आहे.

अत्यंत साध्या पद्धतीने आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांना धरून यावर्षी पालखी सोहळा होणार आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूर येथे देवदर्शनासाठी प्रवास करू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

तसेच राज्याच्या कोणत्याही भागातून पंढरपूरकडे देवदर्शनाला येण्यासाठी प्रवास पास वितरित करू नये, अशा सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना कराव्यात,  असे पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.