Pune : पुणेकर थंडीने गारठले ! पारा 7.4 अंशावर

एमपीसी न्यूज- थंडीचा मोसम सुरु होऊन देखील पुण्यात म्हणावा तसा थंडीचा कडाका अद्याप सुरु झाला नव्हता. मात्र गेल्या काही दिवसापासून हवामानात चढ-उतार घेतल्यानंतर थंडीने पुन्हा पुणेकरांना गारठवले आहे. आज, शुक्रवारी पुण्याचा पारा 7.4 अंशावर पोहोचला आहे. पुढील दोन दिवसात तापमानात घट होऊन अजून थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यात आज कमाल 27 तर किमान 7.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या आठवडभरात तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने राज्यातील काही भागातील तापमानामध्ये वाढ झाली होती. ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना स्वेटरची गरज भासली नाही.पुणे शहरात सोमवारी व मंगळवारी दिवसभर ढगाळ हवा होती, त्यामुळे उकाडा जाणवत होता.

उकाड्यामुळे नाराज झालेले पुणेकर थंडीची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर पुण्यातील तापमानामध्ये कमालीची घट होऊन किमान तापमान 7.4 अंशावर तर कमाल 27 अंशावर येऊन पोचले. त्यामुळे या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पुणेकर आता सरसावले असून स्वेटर, कानटोपी, मफलर असा जामानिमा करून मॉर्निग वॉक करण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नाशिक इथं 5.7 अंश सेल्सियस झाली आहे. महाबळेश्वरमध्येदेखील तापमानात घट झाली असून दवबिंदू गोठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पाचगणीकडे पर्यटकांची रीघ लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.