Pune : केंद्र सरकारच्या सकारात्मक पाठींब्याने देशभरातील वास्तुविशारद, अर्बन डिझायनर्स आणि प्लॅनर्स यांसाठी नजीकच्या भविष्यात मोठ्या संधी

एमपीसी न्यूज – आज आपण देशातील एका उत्साहपूर्ण काळात (Pune) जगत आहोत. आपल्या आजूबाजूला अनेक विकासात्मक कामे होत आहेत. शिवाय आपली अर्थव्यवस्था ही नजीकच्या काळात 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर पायाभूत सोयीसुविधांची वेगाने होत असलेली कामे, खास शहरीकरणासाठी केंद्र सरकारने राखीव ठेवलेले 2300 कोटी रुपयांचे बजेट या महत्त्वाच्या बाबी आहेत.

या परिस्थितीत देशभरातील वास्तुविशारद,अर्बन डिझायनर्स आणि प्लॅनर्स यांसाठी नजीकच्या भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध वास्तुविशारद आणि वास्तुशिल्प संगत या संस्थेचे भागीदार राजीव कटपलिया यांनी केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस ही वास्तुविशारदांची देशपातळीवरील अग्रगण्य संस्था आहे. संस्थेच्या पुणे सेंटरचे नवनिर्वाचित अध्यक्ष विकास अचलकर व नवीन कार्यकारिणीचा स्वागत समारंभ नुकताच बंडगार्डन रस्यावरील शेरेटन ग्रँड हॉटेल येथे संपन्न झाला.

त्यावेळी राजीव कटपालिया यांनी बीजभाषणाद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. आयआयएच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे संयुक्त सहसचिव वास्तुविशारद संदीप बावडेकर, आयआयए, महाराष्ट्रचे अध्यक्ष (Pune) वास्तुविशारद संदीप प्रभू, सोमाणी सिरॅमिक्सचे श्रीवत्स सोमाणी, नवनिर्वाचित उपाध्यक्ष वास्तुविशारद सीतेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी नवीन कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले.

केंद्र सरकारने तब्बल 2300 कोटी रुपयांचे बजेट हे केवळ शहरीकरणासाठी राखीव ठेवले असून ही बाब आजवर पहिल्यांदाच घडली असल्याकडे राजीव कटपलिया यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, “केंद्र सरकार विकासात्मक आणि सर्वांगीण दृष्टीकोनासोबतच आधुनिक शहरीकरणाच्या दृष्टीने विचार करीत आहे ही महत्त्वपूर्ण व सकारात्मक बाब आहे.

विशेष म्हणजे देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांतील प्रकल्पांसाठी सरकारने प्रत्येक 1000 कोटी रुपये इतके बजेट ठेवले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात यासंबंधित अनेकांना विविध संधी उपलब्ध होऊ शकतील.”

शहारातील वास्तुविशारद यांसोबतच बंगलो स्पेशॅलिस्ट, इंटीरिअर स्पेशॅलिस्ट, एन्व्हायर्नमेंटल कन्सल्टंट्स, लँडस्केप डिझायनर्स अशा सर्वांना एकाच छताखाली एकत्र आणत सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील राहू असे सांगत वास्तुविशारद विकास अचलकर म्हणाले, “लायजनिंग, कायदा, शैक्षणिक, स्टडी टूर आणि कार्यक्रम व प्रायोजक समिती अशा विविध 5 समित्यांची स्थापन करून आयआयएचा पुणे विभाग कार्यरत राहील.

आज संस्थेचे असलेले 600 सभासद नजीकच्या काळात 1500 करण्याचा आमचा मानस असून त्यासाठी आम्ही पुढील दोन वर्षे प्रयत्नशील राहू.”

वास्तुविशारद म्हणून काम करीत असताना निसर्गासोबतचे नाते हा घटक नेहमी लक्षात घ्यायला हवा. माझ्या प्रत्येक प्रकल्पात मी हे नाते जपायचा आवर्जून प्रयत्न केला असे सांगत कटपलिया यांनी भूजमध्ये झालेल्या भूकंपातील मृतांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आलेला स्मृतीवन प्रकल्प, शरयू नदीच्या किनाऱ्यावरील अयोध्ये जवळील ग्रीनफिल्ड प्रकल्प, नालंदा विद्यापीठ प्रकल्प, पुण्यातील फ्लेम विद्यापीठ अशा त्यांनी साकारलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

नजीकच्या भविष्यात अयोध्या हे शहर पर्यटनस्थळाप्रमाणे विकसित होत असताना तेथील लोकसंख्या वाढीची शक्यता लक्षात घेत शहराच्या पूर्वेला ग्रीनफिल्ड या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे.

ICC World Cup : विश्वचषकाच्या तिकिट विक्रीची अधिकृत तारीख जाहीर; पुण्याच्या मैदानाची तिकिटे 31 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध

या प्रकल्पाची उभारणी करताना पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत, झाडांच्या, वृक्षांच्या स्थानिक प्रजाती यांची जपवणूक करीत प्रकल्पाचे डिझाईन करण्यात येत असल्याचे माहिती राजीव कटपलिया यांनी दिली.

कोणत्याही प्रकल्पावर काम करीत असताना निसर्गत: उपलब्ध गोष्टींचा कल्पकपणे वापर करण्यावर भर देत अपेक्षित परिणाम कसा साधता येतो याची सोदाहरण माहितीही त्यांनी दिली.

व्हर्टीकल विकासावर भर देत असताना दोन इमारतींमधील उपलब्ध जागेचा वापर कसा करता येईल, याबद्दलही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सीतेश अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर महेश बांगड व अनघा परांजपे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.