Pune : वाहतुकीस अडथळा करणाऱ्या बेवारस वाहनांवर आकारणार 5 ते 15 हजारांपर्यंत दंड

एमपीसी न्यूज- पुण्यातील अनेक रस्त्यांवर खूप दिवसांपासून बेवारस वाहने उभी केलेली आढळून आलेली आहेत. अशा वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. वाहतूक कोंडी, अपघात अशा समस्यांना सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून शहरातील बेवारस वाहने हटविण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. अशी वाहने सोडविण्यासाठी आलेल्या वाहनधारकाकडून 5 ते 15 हजारांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून शहरातील रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा ठरणारी, रस्त्यांवर सोडून दिलेली वाहने हटविण्यात येत आहेत. अशा वाहनांचा शोध घेऊन ती वाहने झेड ब्रीज जवळील नदीपात्राच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. 6 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत पुणे शहरातील विविध भागांमधून एकूण 116 दुचाकी आणि चारचाकी वाहने उचलून नदीपात्राजवळ ठेवण्यात आली आहेत.

या कारवाईसाठी पुणे महानगरपालिकेकडून वाहने उचलण्यासाठी क्रेन आणि टेम्पो पुरवला जात असून उचलून आणलेल्या वाहनांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. अशी वाहने सोडविण्यासाठी वाहनधारकाला दंड भरावा लागणार आहे आणि भरलेल्या दंडाची पावती दाखविल्यानंतरच वाहन परत दिले जाणार आहे.

या दंडाची रक्कम खालीलप्रमाणे असेल –

1) दुचाकी – 5000 रूपये
2) सहाआसनी, तीन आसनी, रिक्षा आणि तीन चाकी टेम्पो – 10000 रूपये
3) कार, जीप, इ. – 15000 रूपये

पुणे शहरातील वाहतूक सुरक्षिक आणि सुरळीत करण्यासाठी ही कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहने उभी करू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.