Dehuroad : मोबाईल चोरी करणारी गजा, पप्याची जोडी अटकेत

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई

एमपीसी न्यूज – दुकानाचे शटर उचकटून दुकानातून मोबाईल चोरी करणाऱ्या गजा आणि पप्या या जोडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 72 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने केली.

गजानन उर्फ गजा उर्फ शिवा भगवान पवार (रा. किवळे मूळ रा. बुलढाणा), संजय उर्फ पप्या उर्फ ब्लेड पप्या अण्णासाहेब पवार (रा. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड रेल्वे स्टेशन परिसरातील मोबाईलचे दुकान अज्ञात चोरट्यांनी 30 जुलै रोजी रात्री फोडले. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाचने केला.

गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस नाईक संदीप ठाकरे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर यांना माहिती मिळाली की, देहूरोड रेल्वे स्टेशन येथे मोबाईलच्या दुकानात चोरी करणारा आरोपी मुकाई चौकात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून गजा पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या एका साथीदारासोबत हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानुसार गजाला अटक करून त्याचा साथीदार पप्या याला देखील अटक केली. दोघांकडून 72 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या कामगिरीमुळे देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोडखे, पोलीस कर्मचारी मयुर वाडकर, फारुख मुल्ला, संदीप ठाकरे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, ज्ञानेश्वर गाडेकर, दत्तात्रय बनसुडे, भरत माने, दयानंद खेडकर, शामसुंदर गुट्टे, राजकुमार इघारे, दयानंद भोसले, अतुल लोखंडे, भास्कर भारती, नाजुका हुलावळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.