Pimpri : गाड्या रद्द झाल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल

एमपीसी न्यूज – खंडाळा घाटातील जामरूंग व ठाकूरवाडी रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीचे काही डब्बे आज (सोमवारी) पहाटे घसरल्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला.

जामरूंग व ठाकूरवाडी रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीचे डब्बे घसरल्याने पुणे-भुसावळ एक्‍सप्रेस पुणे-मुंबई इंद्रायणी, इंटरसिटी, सिंहगड, डेक्कन एक्‍सप्रेस रद्द केली. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडहून मुंबईकडे जाणा-या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रेल्वे रद्द झाल्यामुळे चिंचवड रेल्वे स्थानकात दिवसभर शुकशुकाट होता. अनेकांनी वाकड, चिंचवड, पुणे एस. टी. बस स्थानकाकडे धाव घेतली.

प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेता मुंबईकडे जाणा-या खासगी जीप, ट्रॅव्हल्सनी जादा पैसे उकळले. अनेकांना पिंपरी, चिंचवड रेल्वे स्थानकावरूनच घरी परतावे लागले. दर पावसाळ्यात खंडाळा घाटात दरडी कोसळणे, डबे घसरणे आदी प्रकार वारंवार घडतात. रेल्वेमंत्री व मध्यरेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, खंडाळा घाटात जादा कर्मचारी नेमावे, संपूर्ण घाटातील दरडीची पाहणी करून धोकादायक रेल्वे मार्गावर पडणारी दरडीची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.

यासंदर्भात रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, सुधीर साहनी, ऍड. मनोहर सावंत, शरद चव्हाण, नारायण भोसले, नयन तन्ना, मुकेश चुडासमा, मनोहर जेटवाणी, कैलास लोकवाणी, सूरज आसदकर, निर्मला माने आदींच्या स्वाक्षरीचे निवेदन पाठविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.