Rajgurunagar : भीमा नदीच्या पुलावर ट्रकची दुचाकीला धडक; अपघातात बापलेकीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरूनगर येथे भीमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात वडिलांसह तीन वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, यात मुलीची आई जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी 11.15 च्या सुमारास घडली.

सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील (वय 35), मुलगी आरोही सतीश वळसे पाटील (वय 3) असे अपघातात मृत्युमुखी झालेल्यांची नावे असून जयश्री सतीश वळसे-पाटील (सर्व रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) ह्या जखमी झाल्या आहेत.

या अपघाताबाबत सतीशचा चुलतभाऊ संतोष केशव वळसे-पाटील यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक ज्ञानेश्‍वर सखाराम गोटेकर (वय 40, रा. वाळवी, ता. सिन्नर, नाशिक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पुणे- नाशिक महामार्गावरून नाशिककडे ट्रक (एमएच 15 जीबी 7275) जात होता. त्याचवेळी मंचर येथे दुचाकीवरून (एमएच 14 डीएल 1557) सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील, मुलगी आरोही सतीश वळसे पाटील आणि जयश्री सतीश वळसे पाटील हे गावाला थापलिंग यात्रेनिमित्त निघाले होते. राजगुरूनगरजवळील पुणे-नाशिक महामार्गावरील भीमा नदीवरील पुलावर ट्रकने दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीवरील सतीश वळसे पाटील आणि मुलगी आरोही हे दोघेजण ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पत्नी जयश्री यांना गंभीर दुखापत झाली आहे. मुलगी आणि वडील यांना तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे शवविच्छेदन करून वडिलाचा व मुलीचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. सतीश हे पिंपरी काळेवाडी येथे एका खासगी कंपनीत कामाला होते. तेथे ते कुटुंबासह राहत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.