Wakad : तरुणीवर बलात्कार, लग्न आणि बलात्कार; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणीच्या मर्जीविरोधात तिला पळवून नेले. नातेवाईकाच्या घरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर आळंदी येथे नेऊन जबरदस्तीने तिच्याशी विवाह केला. विवाहानंतरही तरुणीवर जबरदस्ती करून शरीर संबंध ठेवला. तीन वर्ष सुरु असलेल्या या प्रकाराला कंटाळून तरुणीने पोलिसात धाव घेत चौघांवर गुन्हा नोंदवला.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी तरुण आणि त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2016 मध्ये तरुणी ताथवडे येथील एका महाविद्यालयात शिक्षण गेट होते. त्यावेळी आरोपी तरुणाने तिला बळजबरीने मोटारसायकलवरून वाल्हेकरवाडी येथे राहणा-या त्याच्या नातेवाईकाच्या घरी नेले. तरुणीच्या मर्जीविरोधात तिच्यावर बळजबरी करून शरीरसंबंध ठेवले. तरुणीला बदनामी आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणीने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही.

त्यानंतर तरुणीला पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरून तरुणाने त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने बळजबरीने कारमध्ये घालून आळंदी येथे नेले. बदनामी आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर देखील तिच्या मर्जीविरोधात तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. आरोपीने तरुणीची सोशल मीडियावर बदनामी केली. तसेच तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.